Print
Hits: 2583

सकाळ वृत्तसेवा
१७ जून २०१०

येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, दररोज सुमारे वीस रुग्णांवर उपचार केले जात आहेत. बुधवारी (ता.16) दुपारपर्यंत पंधरा रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी पाचजणांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

हिंगोली शहरासह परिसरात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत. दूषित पाण्यामुळे साथ पसरत चालली आहे. शहरासह परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळेच ही साथ पसरत असल्याचे सांगण्यात आले आहे. गॅस्ट्रोची साथ पसरत असली तरी शहरासह परिसरातील गावांमध्ये शुध्द पाणीपुरवठ्याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

हिंगोली शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे. फुटलेल्या जलवाहिन्यातून पाणीपुरवठा होताना पाणी रस्त्यावर येत असून पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर हेच पाणी पुन्हा जलवाहिनीत जात असल्याचे चित्र आहे. दूषित झालेले पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

दरम्यान, येथील शासकीय रुग्णालयात शहरासह तालुक्‍यातील सुमारे वीसपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.

बुधवारी (ता. 16) दुपारी बारा वाजेपर्यंत पंधरा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामधे शेख खैरूनिसा (रा. लिंबाळा), शेख कलंदर (रा. खरबी), यशदीप राठोड (यशवंतनगर), वंदना कुरे (डिग्रस), शेख अन्वर (रा. मस्तानशहानगर), शांताबाई भोकरे (पारडा), विष्णू सोनटक्के (रा. पिंपरखेड), शिवराम बगाटे (रा. कोथळज), धुळबा ठाकरे (रा. भिंगी), यास्मीन परवीन (रा. मंगळवारा), संगीता गजानन (रा. अंधारवाडी), मुस्कान बेगम (रा. तोफखाना), श्रीमती कौशल्याबाई (रा. कंजारा), रेखा गाडे (रा. सवड), श्रीमती कमलबाई (रिसाला) यांचा समावेश असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. यापैकी शेख कलंदर, रेखा गाडे, शेख खैरुनिसा यांची प्रकृती गंभीर असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर मंगळवारी (ता.15) आलेल्या पंधरा रुग्णांपैकी गणेश पलटनकर, सविता हनवते यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.