सकाळ वृत्तसेवा
१५ जुलै २०१०
दोडामार्ग, भारत
तालुक्यात व सावंतवाडी तालुक्यातील काही भागांत विचित्र तापामुळे रुग्ण हैराण झाले आहेत. अंग मोडून येणाऱ्या तापानंतर दीर्घकाळ सांधेदुखी राहत असल्याने या तापाची शिकार झालेले रुग्ण अंथरुणाला खिळत आहेत. या परिसरात एडिस डासही आढळू लागल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील तळकट, कुंब्रल परिसरापासून ते सावंतवाडी तालुक्यातील बांद्यापर्यंत गेले पंधरा दिवस या तापाचे अनेक रुग्ण उपचारासाठी खासगी दवाखाने, आरोग्य केंद्रात हेलपाटे घालत आहेत. ही सुमारे 70 ते 80 गावे आहेत. यात पहिल्यांदा सणकून ताप येणे, सोबत अंगदुखीही असते. चार-पाच दिवसांत ताप गेल्यानंतर सांधेदुखी कायम राहते. यामुळे अशक्तपणा येऊन रुग्ण हैराण होतो. ही लक्षणे चिकनगुण्यासदृश आहे; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चिकनगुण्या झाल्यास पंधरा दिवसांपर्यंत ताप व सांधेदुखी राहते. तुलनेत या तापात थोडा कमी काळ ही लक्षणे आढळत आहेत. तळकट पंचक्रोशीत गेल्या पंधरा दिवसांत शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचे समजते. एप्रिलपासून या भागात रुग्ण सापडत आहेत. यातील काहीजण तर महिना-महिना अंथरुणाला खिळले आहेत. रक्त तपासणी नमुन्यांचा अहवाल वेळेत येत नसल्याचेही समजते.
चिकनगुण्या व डेंग्यू या तापाचे कारण ठरणाऱ्या एडिस या डासांची संख्याही परिसरात वाढली आहे. त्यामुळे हा ताप फैलावल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तळकट परिसरात वैद्यकीय पथकाकडून पाहणीही सुरू आहे. त्यांनाही हा डास आढळला. शासकीय आरोग्य केंद्राकडे या तापावर "पॅरासिटामॉल' गोळ्या हे एकमेव औषध उपलब्ध आहे. त्याचा डोस दिल्यावर ताप जातो; मात्र सांधेदुखी कायम राहते. शासकीय आरोग्य केंद्राकडील या मर्यादित उपचारामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. बांदा परिसरात गेल्या वर्षी अशाच तापाची साथ पसरली होती. दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतर ती आटोक्यात आली. सलग दुसऱ्या वर्षीही हा प्रकार घडल्याने घबराट पसरली आहे. चिकनगुण्या किंवा डेंग्यूचे निदान जिल्ह्यात होत नाही. यासाठी रक्तनमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. या प्रक्रियेला वेळ लागतो.
तळकट आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजगे याबाबत म्हणाले, ""आमच्याकडे येणारे रुग्ण तापसरीचे आहेत. त्यांना आवश्यक ते उपचार दिले आहेत. आमच्या पथकांमार्फत परिसरात पाहणी सुरू आहे.''
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. धर्मा एस. गबरे याबाबत म्हणाले, ""एडिसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमधील जागरुकता हा महत्त्वाचा घटक आहे. घराजवळील पाणीसाठ्यात या डासाची उत्पत्ती होते. ती होऊ नये व डास चावणार नाहीत, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. या आजारांवर पॅरासिटामॉल हे सध्या तरी सगळ्यात प्रभावी औषध आहे. त्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.''
"एडिस'पासून रक्षणासाठीकाय कराल?
- या डासाची उत्पत्तीस्थाने (पाणी साठून राहणाऱ्या वस्तू) नष्ट करणे
- हा डास दिवसा चावत असल्याने त्यावर प्रतिबंधक उपाय
- पाण्याच्या टाक्यांमध्ये गप्पी माशांची पैदास
- प्रादुर्भाव झाल्यास त्वरित वैद्यकीय उपचार
- वैद्यकीय उपचाराबरोबरच आरामाचीही गरज
असा येतो ताप
या तापाची सुरवात पाठदुखीने होते. यानंतर छाती भरून येऊन कंबर व कणा गच्च होतो. पाय, डोके जड होऊन मान दुखते. यानंतर सणकून ताप येतो व अर्धा दिवस ताप आला, तरी अशक्तपणामुळे धाप लागते. झोप येत नाही. डोळेही जड होतात. अगदी एप्रिलपासून या तापाचा प्रादुर्भाव सुरू आहे.