सकाळ वृत्तसेवा
०६ मे, २०१०
महादेव अहिर
वाळवा, भारत
इको फ्रेंडली "पीएचसी' निर्माण करण्याचे काम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गतीने सुरू आहे. यापूर्वीच परिसर हिरवागार केला आहे. आता थेट रुग्णाला देण्यात येणारी सेवा, रेकॉर्ड, कचरा निर्मूलन, अंतर्गत यंत्रणा यासाठी अंमलबजावणी करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. कोडक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
दोन वर्षांपूर्वी (कै.) सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कुंभार यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात नारळ, आंबा, चिंच, आवळा, बेलफळ, लिंब, वड, पिंपळ, चिकू, सीताफळ, अशोक अशी झाडे लावण्यात आली. ही सर्वच झाडे सध्या जोमदारपणे वाढली आहेत. सुमारे सहाशे झाडे आहेत. विविध आयुर्वेदिक वनस्पतींचीही लागवड करण्यात आली आहे. झाडांच्या देखभालीसाठी आरोग्य कर्मचारी, अधिकारी, स्थानिक कार्यकर्ते सतत झटत असतात.
बाह्य परिसराच्या सुशोभिकरणानंतर आता आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सुविधांकडे लक्ष देण्यात आले आहे. अपारंपरिक ऊर्जास्त्रोतातून विजेची सोय करण्यात आली आहे. या ऊर्जेतून भारनियमन काळात रुग्णांना पंखे व इतर यंत्रणांचा वापरही करता येतो. पिण्याच्या पाण्यासाठी ऍक्वागार्ड यंत्रणा उभारण्यात आली आहे. मिशन वाळवा पीएचसीच्या माध्यमातून आधीच आरोग्य केंद्राची अद्ययावत इमारत बांधली आहे. अंतर्गत फर्निचर, रुग्ण विभाग, बाह्य रुग्ण विभाग, शस्त्रक्रियागृह, स्वच्छतागृहे अशा सर्व विभागांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. आरोग्य केंद्रात ओला, सुका कचरा टाकण्यासाठी वेगवेगळ्या रंगाची भांडी ठेवण्यात आली आहेत, तर जैविक कचरा निर्मूलनासाठी स्वतंत्र खड्डा केला आहे. आरोग्य केंद्राचे सर्व कामकाज संगणकीकृत करण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे संगणक खरेदी करण्यात आली आहे.
आरोग्य केंद्रात रक्त, लघवी तपासणी, श्वानदंश, सर्पदंशावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. सर्वच पातळ्यांवर आरोग्य केंद्र इको-फ्रेंडली बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्र बनतेय 'इको फ्रेंडली'
- Details
- Hits: 3542
0