Print
Hits: 2773

सकाळ वृत्तसेवा
१२ ऑगस्ट २०१०
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत

सायन येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील तपासण्या यापुढील काळात मोफतच राहणार आहेत. त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी ग्वाही लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधीष्ठात्या डॉ. संध्या कामत यांनी "सकाळ'ला दिली आहे.

या रुग्णालयात गोर-गरिबांसाठी आजाराचे निदान करण्यात येणाऱ्या तपासण्या मोफत होतात. सोनोग्राफी, एन्जीओप्लास्टी, हृदयविकाराशी संबंधित असणाऱ्या काही तपासण्यांसाठी नाममात्र शुल्क द्यावे लागते. मात्र, काही दिवसांपूर्वी न्युक्‍लियर मेडिसिनशी संबंधित असणाऱ्या तपासण्यांसाठी गरीब रुग्णांकडून 250-300 रुपये घेण्याचे ठरविले, या संदर्भातील वृत्त "सकाळ'ने सर्वात प्रथम दिले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी रुग्णालयाच्या अधीष्ठात्या संध्या कामत यांना ही शुल्क आकारणी तूर्तास करू नये, असे आदेश दिले व त्यानुसार संध्या कामत यांनी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना थायरॉईड, टी-1, टी-3, टी-4 या तपासण्यांसाठी लागू करण्यात येणारे शुल्क आकारण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

पालिकेने 2000 साली काढलेल्या अध्यादेशानुसार या तपासण्यांसाठी केईएम आणि नायर रुग्णालयामध्ये शुल्क आकारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळेच सायन रुग्णालयामध्येही ही शुल्क आकारणी करण्यात येणार होती, असे कामत यांनी बुधवारी स्पष्ट केले. मात्र, या रुग्णालयात येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांकडे साधे केसपेपर काढण्यासाठीची रक्कम नसते. त्यांच्याकडून इतके शुल्क घेणे रास्त आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. शहरामध्ये मलेरिया, डेंगी, लेप्टो स्पायरोसीस तसेच अन्य साथीच्या आजारांनी थैमान घातले असून त्यासाठी अनेक खासगी रक्तपेढ्या आणि पॅथॉलॉजी लॅबतर्फे रुग्णांना निःशुल्क रक्त तपासण्या करून देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रतिकूल घटकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी बांधण्यात आलेल्या पालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा मोफतच असाव्या, असे मत या रुग्णालयात काम करणाऱ्या काही डॉक्‍टरांनी व्यक्त केले आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.