सकाळ वृत्तसेवा
२५ मे २०१०
हिंगोली, भारत
तालुक्यातील लिंबी येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ सुरू झाली असून गावात पिण्यासाठी शुद्ध पाणीच नसल्यामुळे गावकऱ्यांना गाळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. दरम्यान सोमवारी (ता.२४) रुग्णांवर उपचार करण्यासाठी गावात आरोग्यपथक दाखल झाले आहे.
तालुक्यातील लिंबी येथे मागील तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ सुरू झाली आहे. गावातील काही रुग्णांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर काही रुग्णांवर सिरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सकाळ'ने आरोग्य केंद्रात सुविधा मिळत नसल्याचे वृत्त सोमवारी (ता.२४) प्रसिद्ध करताच आरोग्य खाते खडबडून जागे झाले. गावात तातडीने आरोग्य पथक रवाना करण्यात आले असून या पथकामार्फत गावकऱ्यांना औषधी गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या शिवाय गावात एक पथक तैनात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाने गावातील पाणी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
दोन तासांनी पाणी
लिंबीतील ग्रामस्थांना एका शेतातील विहीरीतून पाणी आणावे लागते. या विहीरीचे पाणीही एवढे खोल गेले आहे की, तळाशी हंडाभर पाणी जमा व्हायला दोन तास लागतात. एक हंडा भरला की पुन्हा विहीर कोरडीठाक. पुन्हा दोन तासांनतर हंडाभर पाण्याची वाट पाहावी लागते. दुसरी विहीर आहे तर त्यातील पाणी दुषित. गॅस्ट्रोची लागण याच दुषित पाण्याने झाल्याचे सांगण्यात येते.
लिंबी गावात गॅस्ट्रोचे थैमान; आरोग्य पथक दाखल
- Details
- Hits: 3348
0