Print
Hits: 3256

सकाळ वृत्तसेवा
०९ जुन २०१०
गडचिरोली, भारत

दमा रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे यांची ख्याती परप्रांतासोबतच परदेशातही पोचली आहे. केवळ मृगनक्षत्राच्या पर्वावर देण्यात येणाऱ्या मासोळीतून वनौषधी घेण्यासाठी आज (ता. आठ) दमा रुग्णांचे जत्थेच्या जत्थे कोकडी येथे दिसून येत होते. देसाईगंज पंचायत समितीचे सभापती परसराम टिकले यांच्या हस्ते सकाळी अकराला एका रुग्णाला औषध पाजून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. औषध घेण्यासाठी पहाटपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत लाखांवर दमा रुग्णांनी औषधाचा लाभ घेतला.

देसाईगंजपासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकडी तुळशी येथे वैद्यराज प्रल्हाद कावळे मृगनक्षत्राच्या दिवशी दरवर्षी गनी व भुरभुसा या प्रजातीच्या मासोळीतून दमाग्रस्तांना मुक्‍त करण्यास औषध देतात. आज मृगनक्षत्राच्या दिवशी कोकडीचे सर्व रस्ते नागरिकांनी फुलून गेलेले होते. एवढेच नाही, तर प्रत्येकाच्याच घरात पाहुण्यांची गर्दी दिसून येत होती. वाहतुकीच्या साधनांच्या फारशा सोयी उपलब्ध नसल्याने नागरिकांना पाच किलोमीटर अंतर पायपीट करावी लागली. रुग्णांना औषध देण्यासाठी लागणाऱ्या सुमारे दीड लाख मासोळ्या आज सकाळी कुरखेडा तालुक्‍यातील घाटी येथील तलावातून आणण्यात आल्या. गावातील तरुण, वृद्ध व लहान मुलेसुद्धा आजारी लोकांच्या सेवेत गुंतलेले होते. एकाच वेळी 50 रुग्णांना औषधवाटप करण्यात येत होते यामुळे दुपारी दोनपर्यंत 40 हजार रुग्णांना औषधीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर गर्दी बघून गावकऱ्यांनी कार्यकत्यांची सख्या वाढविली. रखरखत्या उन्हात लोक औषधी घेण्यासाठी रांगेत उभे होते. नवजात बालकापासून तर वृद्धांनीसुद्धा कोकडीत आज हजेरी लावली होती. प्रल्हाद कावळे व सभापती परसराम टिकले लोकांच्या व्यवस्थेकडे जातीने लक्ष देत होते. दरवर्षाप्रमाणेच यंदाही कोकडी येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील दमा रुग्णांसह गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू या राज्यांतून तसेच नेपाळ व बांगलादेशातील रुग्णांनीसुद्धा वैद्यराज कावळे यांच्या औषधीचा विनामूल्य लाभ घेतला.

प्रशासनाविषयी नाराजी
लाखो दमा रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या वैद्य प्रल्हाद कावळे यांच्या सेवेने कोकडीचेच नव्हे; तर गडचिरोली जिल्ह्याचे नाव देशाच्या नकाशावर कोरले आहे. दमा रुग्णांना सेवा देण्यासाठी साऱ्या गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू असतात. यंदा तर तीव्र उन्हामुळे रुग्णांच्या संख्येवर परिणाम होईल, अशी शंका घेतली जात होती; मात्र उन्हाची पर्वा न करता दमा रुग्णांचा कोकडीत आज जनसागर उसळला. मात्र, जिल्हा प्रशासनाने यासाठी कुठलीच मदत केली नाही. महामंडळाने बससेवा दिली; परंतु रखरखत्या उन्हात नागरिकांना ताटकळत राहावे लागले. यामुळे गावकऱ्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.