सकाळ वृत्तसेवा
२१ जुलै २०१०
मुंबई, भारत
शहरातील काही सार्वजनिक रुग्णालयांच्या प्रयोगशाळांमध्ये खासगीकरणाच्या प्रक्रियेने वेग धरला आहे. या प्रक्रियेस प्रत्यक्षरूप आल्यास अनेक गोरगरीब रुग्ण त्यात भरडले जाणार असल्याची भीती महाराष्ट्र राज्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाटत आहे. रक्त, थुंकी तपासणीपासून एक्स रे, कार्डिओग्राम सारख्या महागड्या सुविधाही रास्तदरांमध्ये सार्वजनिक रुग्णालयातील गरीब रुग्णांना मिळत असतात, पण जे.जे., जी.टी. रुग्णालयांतून प्रयोगशाळांच्या खासगीकरणासाठी जे प्रस्ताव पुढे आलेले आहेत त्यातून रुग्णांचे कोणतेही हित साध्य होणार नसल्यामुळे हे खासगीकरण त्वरित थांबवावे, अशी मागणी तंत्रज्ञ विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज आंदोलनाच्या माध्यमातून मुंबईमध्ये केली. यात राज्याच्या विविध ठिकाणच्या सार्वजनिक रुग्णालयातील तंत्रज्ञ विभागाचे कर्मचारी आले होते. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगबाद, नागपूर, सोलापूर, मिरज, नांदेड; तसेच यवतमाळ या ठिकाणच्या रुग्णालयामधील प्रयोगशाळा या इतर खासगी कंपन्यांच्या हाती गेल्यास येथील गोरगरीब रुग्णांनी कुठे जायचे, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
आंदोलनामध्ये "क्ष' किरण तंत्रज्ञ संघटना, बृहन्मुंबई राज्य सरकारी परिचारिका संघटना, शासकीय औषधनिर्माता गट "क' कर्मचारी संघटना, प्रयोगशाळा सहाय्यक संघटना, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता संघटना; तसेच प्रगती परिचारिका संघटना सामील झाल्या होत्या. या रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास येथील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणानुसार प्रयोगशाळेशी संलग्न जे कर्मचारी आहेत त्यांच्या संख्येमध्येही कपात होईल व ही संख्या कमी झाल्यास एम. सी. आय'च्या नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यताही रद्द होण्याची शक्यता या वेळी अध्यक्ष प्रदीप डोंगरे यांनी व्यक्त केली. शासनाने रुग्णालय उभारण्यासाठी अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असताना तज्ज्ञ डॉक्टर्स, प्राध्यापक, कुशल प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोट्यवधी रुपयांची अद्ययावत सुविधा असणारी यंत्रसामग्री असताना रुग्णालयाची प्रयोगशाळा खासगी संस्थेला देण्याचे काय कारण आहे, असा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला.