सकाळ
१८ मे २०१०
बीड, भारत
आजार दूर करण्यासाठी प्रत्येक जण सुरक्षित, स्वच्छ रुग्णालयांची निवड करतो. परंतु रुग्णालयातील औषधांचा कचरा रुग्णालय आणि परिसरात विखुरला जात असल्याने आजार दूर करणारी रुग्णालये रोग पसरविणारी ठरू लागली आहेत. त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातलग, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
शहरात लोकसंख्येच्या तसेच बाहेरगावाहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयांची संख्या ही समपातळीवर आहे. शहरातील विविध रुग्णालयांतून दिवसाकाठी तीन हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेऊन बाहेर पडतात. यामुळे रुग्णालयात औषधोपचारही निश्चितपणे केला जातो. ज्या त्या रुग्णाच्या आजारानुसार काहींना ऍडमिट करून घेतले जाते तर काहींना गोळ्या औषधे दिली जातात. ज्यांना ऍडमिट करून घेतले जाते त्यांच्यावर सलाईन, इंजेक्शन यासह अन्य उपचार केले जातात. मात्र, शहरातील विविध रुग्णालयांतून तीन हजार रुग्ण उपचार घेत असल्याने या तुलनेत चौपटीने जैविक कचरा तयार होतो.
ज्या रुग्णालयात स्वच्छता, स्वतंत्र खोल्या, चांगला कर्मचारीवर्ग किंवा डॉक्टर नसतील अशा रुग्णालयात रुग्ण जातीलच कशासाठी? यामुळे शहरातील रुग्णालये आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी डॉक्टरांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. शहरातील शाहूनगरसह आदर्शनगर भागामध्ये रुग्णालयांची संख्या अन्य भागांपेक्षा जास्त आहे. या परिसरात जागोजागी रुग्णालयातील रुग्णांवर उपचार केल्यानंतर तयार झालेला जैविक कचरा रस्त्याच्या बाजूस किंवा अन्यत्र कर्मचाऱ्यांकडून फेकण्यात येतो. तसेच अनेक ठिकाणी या जैविक कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. यात सलाईनच्या नळ्या, इंजेक्शन, सिरिंज, बाटल्या आदींचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. रुग्णालयांचे आजार दूर करणारी हीच रुग्णालये स्वच्छ व सुरक्षित नसतील तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. या रुग्णालयातील कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडे शासनपातळीवर निर्णय घेऊन शहरातील प्रत्येक रुग्णालयातील कचरा हा व्यवस्थितपणे घेऊन त्याची शहराबाहेर विल्हेवाट लावली पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.