सकाळ वृत्तसेवा
०४ जुलै २०१०
राजन वडके
पिंपरी, भारत
चिंचवड शहरात हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. जून महिन्यापासून "स्वाइन फ्लू'ने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यातच शहरात असलेल्या शासनाच्या औंध सर्वोपचार रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तेथे रुग्णांच्या वैद्यकीय सुविधेचा प्रश्न आहे. या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य आणि वैद्यकीय सेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 2008 - 09 मध्ये शहरात हिवतापाचे 366 रुग्ण आढळले. त्यात गेल्या वर्षी 73 टक्क्यांनी वाढ झाली. सध्या शहरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कचराकुंड्या, दलदलीची ठिकाणे, नाले, नदीतील जलपर्णी यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे.
डासांमुळे होणाऱ्या हिवतापाची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी डासोत्पत्तीची स्थाने नष्ट करणे, शहराची स्वच्छता नियमित करणे आदी उपाय करण्याची गरज आहे. पालिकेतील आरोग्य विभागही याबाबत जागृत झाला असून, त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृपेमुळे "जेएनएनयूआरएम'अंतर्गत मिळणाऱ्या निधीद्वारे शहर स्वच्छतेसाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग म्हणून सफाईच्या कामाचे हळूहळू खासगीकरण करण्यात येत आहे. ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी रिक्षा, तर रस्ते स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा असलेली कोट्यवधी रुपयांची वाहने खरेदी करण्यात आली आहेत.
वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असतानाही रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात. दर पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर लाखो रुपये खर्च केले जातात; परंतु अस्वच्छ आणि कचऱ्याने भरलेल्या नाल्यांची समस्या कायम राहते; तसेच भुयारी गटारांसाठी प्रचंड खर्च करूनही त्याची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने ते तुंबून मैलापाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार घडतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांची अबाळ असते. अद्यापही काही ठिकाणी उघड्यावर सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे दलदल निर्माण होते. एकूणच अनेक ठिकाणी कचरा आणि घाणीचे साम्राज्य दिसते. अनेक ठिकाणचे सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जाते; तसेच जलपर्णीची वाढ रोखण्यात यश येत नाही. पवना शुद्धीकरण प्रकल्प घोषित करून बरीच वर्षे झाली; परंतु त्यास मूर्त स्वरूप आलेले नाही. या सर्व प्रकारांमुळे त्या त्या परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. अशा ठिकाणी डासांची निर्मिती होत असल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. शहर स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रणेवर एवढा खर्च करूनही कचऱ्याचा प्रश्न भेडसावतोच आहे. अस्वच्छतेमुळे अन्य रोगांनाही निमंत्रण मिळते. औषधफवारणी किंवा धूरीकरण नियमित होत नाही. स्वच्छतेबद्दलची अनास्था डास निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. या परिस्थितीमुळे मागील वर्षी हिवतापाच्या रुग्णांत 73 टक्क्यांनी वाढ झाली. आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे ती या वर्षी वाढल्यास आश्चर्य वाटू नये. कारण आरोग्य वैद्यकीय विभागाला खरेदीमध्ये अधिक रस असतो.
"जेएनएनयूआरएम'च्या निधीमुळे एकीकडे शहरातून जाणारा प्रशस्त पुणे-मुंबई महामार्ग, ऑटो क्लस्टर असे मोठमोठे प्रकल्प लक्ष वेधून घेतात. हे प्रकल्प अतिशय आत्मीयतेने उभारले जातात. तेवढीच आत्मीयता वैद्यकीय उपकरणे आणि औषधांच्या खरेदीत दाखविली जाते. मात्र, शहर स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधेबाबत दाखविली जात नाही. शहर स्वच्छतेसाठी खरेदी केलेल्या वाहनांपैकी अनेक वाहने अद्यापही धूळखात पडून आहेत.
सार्वजनिक आरोग्य सुविधेबरोबरच येथील राज्य सरकारच्या औंध सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेचा मुद्दा पुढे आला आहे. डॉक्टरांची गैरहजेरी, रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ, रुग्णांचे अस्वच्छ कपडे, बंद अवस्थेतील रुग्णवाहिका अशी या रुग्णालयाची परिस्थिती आहे. त्यातच क्षयरोग रुग्णालयातच सर्वोपचार रुग्णालय सुरू केल्याने येथे उपचार घेण्यास रुग्णांचे धाडस होत नाही. या रुग्णालयाची सुमारे 400 खाटांची क्षमता असताना त्या ठिकाणी शंभरदेखील रुग्ण असत नाहीत अशी परिस्थिती आहे. कर्मचाऱ्यांची संख्या 400 पेक्षा अधिक असून, त्यांचे वेतन व अन्य सुविधांसाठी दरमहा सुमारे दोन कोटी रुपये खर्च केला जातो, तर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा वापर होत नसल्याचीही माहिती मिळते. या सर्व गोष्टी स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्याची दखल घेतली जात नाही, हे दुर्दैव आहे. वास्तविक, पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि त्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय सेवेचा विचार केल्यास रुग्णालयाच्या कारभारातील त्रुटी दूर करून सुधारणा करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास खऱ्या अर्थाने हे सर्वोपचार रुग्णालय होईल.
"स्वाइन फ्लू'चा रुग्ण सापडण्याला गेल्या 22 जूनला एक वर्ष झाले. "स्वाइन फ्लू'च्या साथीने राज्य सरकारही हादरून गेले होते. वर्षभर ठिकठिकाणच्या लोकांना "स्वाइन फ्लू'ची लागण होत असल्याने सर्वांनीच त्याची धास्ती घेतली. उन्हाळ्यात एप्रिल, मेच्या दरम्यान त्याची तीव्रता काहीशी कमी झाली होती, परंतु गेल्या जून महिन्यापासून "स्वाइन फ्लू'च्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली. गेल्या वर्षी पिंपरी- चिंचवडमधील 158 शिक्षणसंस्थांमधील 278 विद्यार्थ्यांना "फ्लू'ची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना दक्षतेचा इशारा देण्यात आला. त्यामुळे सर्वच शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांनी दक्ष राहण्याची गरज आहे. शनिवारी (ता. 3) पिंपरी-चिंचवड शहरातील फ्लूसदृश रुग्णांची संख्या 582 होती. त्यातील 138 रुग्णांना "टॅमिफ्लू' गोळ्या देण्यात आल्या, तर चार रुग्णालयांत "स्वाइन फ्लू'बाधित दहा रुग्ण दाखल आहेत. जूनपासून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी लक्षात घेता सर्वांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. "स्वाइन फ्लू' टाळण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे लक्षात घेतले पाहिजे.