सकाळ वृत्तसेवा
१८ सप्टेंबर २०१०
मुंबई, भारत
कर्करोगांसह विविध आजारांनी त्रस्त असलेल्यांच्या कमाल दीड लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा खर्च उचलण्यास राज्य शासन तयार असल्याचे सांगून राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात पाच नवी कर्करोग निवारण रुग्णालये उभारण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच येथे केली.
"ओस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया'च्या (ओएआय) नव्या "स्व. श्री. रमाकांत शहा स्मृती स्टोमा क्लिनिक'चे उद्घाटन सुरेश शेट्टी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. परळ येथील "इंडियन कॅन्सर सोसायटी'च्या आवारात असलेल्या या स्टोमा क्लिनिकच्या माध्यमातून ओस्टोमी रुग्णांना उपचारपूर्व तसेच उपचारानंतरचे मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे.
आरोग्यमंत्री शेट्टी यावेळी म्हणाले की, विविध आजाराने त्रस्त असलेल्यांच्या उपचारावर खर्च करण्यासाठी शासनाने 215 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याअंतर्गत उपचार, औषधे, शस्त्रक्रिया आदींसाठी शासन सहकार्य करेल. राज्याच्या 29 टक्के लोकसंख्येला याचा लाभ होणार असून वर्षअखेरपर्यंत ही योजना संपूर्ण राज्यात अवलंबली जाईल. राज्य शासनाच्या पुढाकाराने लवकरच विविध पाच ठिकाणी नवी कर्करोग निवारण रुग्णालये उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
व्यासपीठावर यावेळी उपस्थित डॉ. व्ही. श्रीनिवास, लॉयन डॉ. अशोक मेहता, डॉ. राजपाल, एम. एन. मनोहर यांनी यावेळी आपले सहकारी राहिलेले स्व. रमाकांत शहा यांच्या आठवणींना उजाळा दिला. शहा यांच्या कन्या स्पर्धा कोठारी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. मनोरमा सवूर यांनी यावेळी स्वागतपर भाषण केले. संस्थेच्या कार्यास हातभार लावणाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. अनिला पिल्लई, सुनीता पडवळ, निशी चक्रवर्ती आदीही यावेळी उपस्थित होते. "ओस्टोमी' सदस्य, त्यांचे कुटुंबीय, संस्थेचे कर्मचारी, साहित्य पुरवठादार आदींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
'ओस्टोमी'ला लाखाची देणगी
"ओस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष टी. सिंगारवेल यांनी यावेळी काही समस्यांचा ऊहापोह केला. स्टोमाधारक राज्य तसेच केंद्र शासनातील कर्मचाऱ्यांना मोफत साहित्य पुरवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचप्रमाणे ओस्टोमीधारकांना साहित्य खरेदी करताना त्यावरील मूल्यवर्धित कर, सेवा कर यामुळे अधिक आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.
याचा धागा पकडत आरोग्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सवलती आणि करमाफीबाबत संबंधित खात्याचे मंत्री तसेच अधिकारी यांच्याशी स्वत: चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळी दिले. "ओएआय' आणि "स्टोमा क्लिनिक'ला शुभेच्छा देत आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी संस्थेला एक लाख रुपयांच्या देणगीची घोषणा याप्रसंगी केली. संस्थेच्या नव्या क्लिनिकची जागा अपुरी असून संस्थेला मोठ्या जागेची निकड असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले.