सकाळ वृत्तसेवा
०१ जुन २०१०
नागपूर, भारत
राज्याचे व्यसनमुक्ती धोरण महिनाभरात जाहीर होणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
श्री. मोघे म्हणाले, "कायदा करून व्यसनमुक्ती शक्य नाही. गुजरात, आंध्रप्रदेश एवढेच काय तर वर्धा, गडचिरोली यांसारखी उदाहरणे सर्वांपुढे आहेत. यासाठी जनजागृती, मतपरिवर्तनासह लोकचळवळ राबविण्याची गरज आहे. राज्याची स्वतंत्र संस्कृती, वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. देशानेही व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे. महाराष्ट्राने तर त्यासाठी पुढाकार घेतला. आतापर्यंत ही चळवळ थंडबस्त्यात होती. यापुढे ती आणखी गती घेईल. प्राथमिक व हायस्कुलातील पुस्तकातून वगळलेले गुटखा, तंबाखूचे धडे पुन्हा घेण्यात येतील. संघटना, साधुसंत, ट्रस्ट अथवा औषध देऊन व्यसनमुक्ती करीत असतील, तर त्यांची मदत घेतली जाईल. अधिकारीही यात काम करीत असतील तर त्यांनाही या चळवळीत सहभागी करून घेतले जाईल. अशांना प्रमाणपत्रही देण्यात येईल.'
एकीकडे शासन धान्यापासून दारू बनविण्याचा विचारात असताना व्यसनमुक्ती शक्य आहे का, या प्रश्नावर त्यांनी "लोकांनी दारूच पिऊ नये' असा सल्ला दिला. गेल्या 25 वर्षांत दारूविक्रीचा एकही परवाना दिला गेला नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यापूर्वी जिल्ह्यात असलेले व्यसनमुक्तीचे केंद्र बंद पडले. केंद्र सरकारची 25 कार्यालये आहेत. भविष्यात असे केंद्र उभारण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. एकाच प्रकारच्या खत मागणीमुळे खतविक्रेते "लिंक' करून खतविक्री करतात. असे करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मिहानसंदर्भात अलीकडेच मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न जाणून घेतले. त्यानुसार अधिग्रहण झालेल्या जागेवर उद्योग उभारले जातील, असेही ते म्हणाले.
सॉफ्टवेअरची वाट न बघता राज्यातील सर्व महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची 30 जूनपर्यंत कोअर बॅंकिंग राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये खाती उघडावीत; तसेच एक जुलै 2010 पासून सीबीएस, ईसीएस प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यामध्येच शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी, असे निर्देश देण्यात आल्याचे श्री. मोघे म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांची इतर बॅंकेत खाती आहेत, त्यांनीदेखील 30 जूनपर्यंत राष्ट्रीयीकृत बॅंकात खाती उघडावी, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रपरिषदेला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, जि. प. सदस्य सुरेश कुंभरे, जिल्हा माहिती अधिकारी मोहन राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप डांगे आदी उपस्थित होते.