सकाळ वृत्तसेवा
२४ मे २०१०
राजेश शेळके
रत्नागिरी, भारत
आजवर शस्त्रक्रियेदरम्यान पोटात कात्री सापडल्याच्या, पोटातून दगडासारखा मोठा गोळा काढल्याच्या घटना ऐकल्या होत्या. परंतु एका व्यक्तीच्या पोटातून तब्बल 1 हजार 276 मुतखडे (स्टोन) काढले. त्याच्या किडणीत आणखी हजार मुतखडे असल्याचा धक्कादायक आणि आश्चर्यचकीत प्रकार उघडकीस आला आहे. येथील चिरायू हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीला बरे करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे डॉ. सुनील गोगटे यांनी सांगितले.
सांगली येथील खेडेगावातील शेतकरी मुलाच्या पोटामध्ये हे आश्चर्यकारक मुतखडे सापडले. महिन्याभरापूर्वीच येथील डॉ. सुनील गोगटे यांच्याकडे हा 28 वर्षाचा मुलगा रुग्ण म्हणून आला होता. त्याला लघवीचा आणि पोटदुखीचा प्रचंड त्रास होता. डॉ. गोगटे यांनी एक्सरे व सोनोग्राफी केली. त्यामध्ये या मुलाला जन्मजातच 2 किडण्या चिकटण्याचा "हॉर्सशू' हा आजार होता. त्यामुळे दोन्ही किडण्या काम करत नव्हत्या. किडण्यांच्या नळ्याही आकुंचन पावल्या होत्या. त्यामुळे त्याला पोटदुखीचा आणि लघवीचा त्रास होता. डॉ. गोगटे यांनी संबंधित रुग्णाला तत्काळ शस्त्रक्रिया करण्याची सूचना केली. रुग्णानेही ती मान्य करून काल येथील चिरायू हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. डॉ. मनोज मणचेकर आणि डॉ. अभय धुळप यांच्या सहकार्याने सुमारे 1 तास 50 मिनिटांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली.
त्या मुलाच्या प्रथम उजव्या किडणीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या किडनीमधून एक-एक म्हणत तब्बल 1 हजार 276 मुतखडे काढण्यात आले. तसेच आकुंचन पावणाऱ्या किडनीच्या नळीचीही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 1 महिन्यानंतर डाव्या किडनीची पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या किडनीमध्येही 1 हजार मुतखडे असल्याचा अंदाज डॉ. गोगटे यांनी वर्तविला. शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आलेल्या मुतखड्यांचा आकार 4 सेंमी ते 40 मिमी यादरम्यान आहे. आजवर अशाप्रकारची कठीण आणि आव्हानात्मक घटना कोकणात नव्हे तर महाराष्ट्रातही घडली नसल्याचा दावा डॉ. गोगटे यांनी व्यक्त केला. मात्र या तरुणाला आजपर्यंत त्याचा त्रास झाला नाही हे मात्र विशेष आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीत मूतखड्यावरील अवघड शस्त्रक्रिया
- Details
- Hits: 3351
0