सकाळ वृत्तसेवा
२६ जुन २०१०
नागपूर, भारत
रक्ताचा कर्करोग तसेच रक्ताच्या इतर विकारावरील उपचारासाठी नागपुरात प्रथमच "सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमॅटोलॉजी व ऍन्कोलाजी' (सिहो) हे स्वतंत्र रुग्णालय तयार झाले आहे. रविवारी (ता. 27) सकाळी 10 वाजता धंतोली परिसरात उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डॉ. एस. एम. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
दहा विविध कर्करोगाच्या रुग्णात एक रक्ताचा कर्करोगाचा रुग्ण आढळून येतो. रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, परंतु त्यावरील उपचारासाठी पुणे, मुंबईसारख्या शहराशिवाय पर्याय नाही. रक्ताच्या कर्करोगावर या रुग्णालयात विशेष उपचार करण्यात येतील. सिहो रुग्णालयाचे वैशिष्ट्य असे की, बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार पद्धती प्रथमच नागपुरात सुरू करण्यात येत आहे. मागील बारा वर्षांपासून डॉ. पोफळी ही शस्त्रक्रिया करीत आहेत. विदर्भासहित छत्तीसगड, मध्यप्रदेशातील लोकांना उपचार पद्धतीचा फायदा व्हावा, हा उद्देश ठेवून तीस खाटांचे हे रुग्णालय सुरू करण्यात आल्याचे डॉ. अविनाश पोफळी यांनी पत्रकारांना सांगितले. न्यूट्रोपॅनिक अतिदक्षता विभाग, कर्करोगावरील शल्यक्रिया, कर्करोग प्रयोगशाळेसह कर्करोगावरील औषधालयाची विशेष सोय सिहोत करण्यात आली आहे. कर्करुग्णांच्या प्लेटलेट्स तयार करण्यासाठी "कॉमटेक एफेरेसीस यंत्र' वरदान ठरत असून, हे यंत्र "सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमॅटोलॉजी व ऍन्कोलाजी' रुग्णालयात सुसज्ज आहे, डॉ. पोफळी यांनी लंडन येथील न्यूकसल विश्वविद्यापीठातून रक्तविकार व कर्करोग विषयात पदवी घेतली आहे. 24 वर्षांच्या या विकारावरील उपचाराचा अनुभव पाठीशी घेऊन नागपुरात ही संस्था उभी केली आहे. त्यांच्या सोबतीला बधिरीकरणतज्ज्ञ म्हणून डॉ. सुरेखा पोफळी आहेत. यावेळी डॉ. प्रियंका पोफळी उपस्थित होत्या.
कर्करुग्णांसाठी स्वतंत्र रक्तपेढीची
'सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमॅटोलॉजी व ऍन्कोलॉजी'संस्थेत कर्करुग्णांसाठी स्वतंत्र रक्तपेढीची सोय तसेच रुग्णाला शुद्ध हवा मिळावी यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करण्यात आली. स्टेमसेल्सच्या माध्यमातून होणाऱ्या उपचारपद्धतीचा लाभ येथे मिळेल, असे डॉ. अविनाश पोफळी म्हणाले.