Print
Hits: 2825

सकाळ वृत्तसेवा
२३ जुलै २०१०
नागपूर, भारत

शालेय शिक्षणापासून तर नोकरी आणि पदोन्नतीमधील आरक्षणासाठी प्रमाणपत्रावर जातीचा उल्लेख करावा लागतो. परंतु, उपचाराठी आलेल्या रुग्णाला जर, "तुझी जात काय?' अशी विचारणा केली जात असेल, तर याला काय म्हणावे? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागात हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे.

मेडिकलमध्ये बाह्यरुग्ण विभागात नवीन कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला त्याची जात विचारली जाते. जुन्या कार्डवर जातीचा रकाना नव्हता. परंतु, नवीन कार्डवर आता जातीची नोंद करण्यासाठी एक कॉलम तयार करण्यात आला आहे. मेडिकलमध्ये दर दिवसाला बाह्यरुग्ण विभागात सुमारे दोन ते अडीच हजार रुग्णांची नोंद होते. यामुळे दररोज अडीच हजार रुग्णांना जात काय, अशी विचारणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही खजील झाल्यासारखे वाटते. परंतु, कार्यालयीन काम म्हणून ते करीत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. पूर्वी नाव, वय, लिंग, व्यवसाय, मासिक उत्पन्न, आजार आणि निष्कर्ष अशा नोंदी कराव्या लागत होत्या; परंतु आता नव्याने "जात' नोंदविण्याचा रकाणा कार्डवर आहे. राज्यभरातील सरकारी रुग्णालयातील कार्डवर जातीची नोंदणी करण्याचा रकाना आहे. किमान वर्षभरापासून जात नोंदविण्यासाठीचे निर्देश आले होते. त्यानुसार, कार्ड तयार केले. सुरवातीला जातविरहित कार्ड होते. आता जातीच्या रकाण्यात जातीची नोंद केल्याशिवाय रुग्णाला पुढील उपचारासाठी जाताच येत नाही, हे विशेष. अनेक आजार आनुवंशिक आहेत. जातीच्या नोंदीमुळे जाती-जमातीमधील असलेल्या आजाराचे सर्व्हेक्षण होत असते. याशिवाय आजाराचे त्या जातीमध्ये असलेल्या प्रमाणाची माहिती उपलब्ध होत असल्याचे मेडिकलमध्ये कार्यरत सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले. मेडिकलमध्ये रुग्णांची काढलेली "जात' उपचारासाठी दिशादर्शक ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.