सकाळ वृत्तसेवा
१५ सप्टेंबर २०१०
मुंबई, भारत
साथीच्या विविध आजारांनी मुंबई बेजार झाली असतानाच "डोळे येणे' (कंजंक्टिवायटिस) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी दोन महिने डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य खात्याने केले आहे. गेल्या आठवड्याभरात डोळ्याच्या साथीचे रुग्ण आढळून आल्याने हे खाते सतर्क झाले आहे.
मुंबईत सध्या गणेशोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे. हा संसर्गजन्य रोग सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आढळून येतो. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डोळे लालसर होणे, डोळे टोचणे, दुखणे, डोळ्यातून स्त्राव वाहणे अशी लक्षणे आढळल्यास पालिकेच्या दवाखान्यात जावून उपचार घ्यावेत. या रोगाचा फैलाव हवेमार्फत होतो. एकमेकांचा रुमाल वापरू नये. वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास हा रोग सात दिवसात बरा होवू शकतो, असे पालिकेच्या आरोग्य खात्याने म्हटले आहे.
खबरदारीच्या उपाययोजना
-गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
-हा रोग झालेल्या रुग्णांनी डोळ्यावर चश्मा लावावा.
-वारंवार डोळ्यांना हात लावू नये. डोळ्यांना हात लावल्यास त्यापूर्वी व त्यानंतर हात साबणाने स्वच्छ धूवावेत.
-कोमट पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. शक्य असल्यास टिश्यू पेपरचा वापर करावा.
-डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यामध्ये "आय ड्रॉप्स' टाकावेत.
-डोळे आल्यास मुलांना शाळेत पाठवू नये.