सकाळ वृत्तसेवा
०६ ऑगस्ट २०१०
मालेगाव, भारत
येथील दातारनगर भागातील शेख सुलतान शेख आकील (वय 2) या बालकाला पोलिओ असल्याचे आढळल्याने येथे खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या सात महिन्यांत पोलिओचा हा दुसरा रुग्ण आढळला आहे.
शेख सुलतान याची जन्मतारीख 1 जुलै 2008 अशी असून, त्याला गेल्या दोन वर्षांत 16 पैकी फक्त तीन डोस देण्यात आले. त्याचे लसीकरण नियमितपणे झालेले नाही, हे स्पष्ट झालेले आहे. सुलतानला 29 जुलैला महापालिकेच्या अलि अकबर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्याला सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची विष्ठा तपासणीसाठी मुंबई येथे एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आली. तिचा अहवाल आज सायंकाळी महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाला. तो "पॉझिटिव्ह' असल्याचे आयुक्त जीवन सोनवणे व आरोग्याधिकारी डॉ. भरत वाघ यांनी "सकाळ'ला सांगितले.
गेल्या जानेवारीत येथे पोलिओचा एक रुग्ण आढळला होता. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत कोठेही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. मालेगावला मात्र सात महिन्यांत दोन रुग्ण आढळले. शहरात अजूनही 331 कुटुंबीयांनी बालकांना एकदाही पोलिओ डोस दिलेला नाही.
मालेगावला पोलिओचा रुग्ण आढळला
- Details
- Hits: 3395
0