सकाळ वृत्तसेवा
०४ सप्टेंबर २०१०
पुणे, भारत
राज्यात 15 ते 49 वर्षे वयोगटातील मृत्युमुखी पडणाऱ्या प्रत्येक स्त्रीची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे संकलित करण्यात येणार आहे. मातामृत्यू रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "मातामृत्यू अन्वेषण' कार्यक्रमांतर्गत ही माहिती घेण्याचे आदेश खात्यातर्फे बजावण्यात आले आहेत.
राज्यातील मातामृत्यू अद्यापही पूर्णपणे रोखण्यात आलेले नाहीत. देशाच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे "राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम' (एनआरएचएम) राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत राज्यातील "प्रसूती आणि बाल आरोग्य' (आरसीएच) धोरण निश्चित करण्यात आले आहे. "मातामृत्यू अन्वेषण' हा त्यातील एक कार्यक्रम आहे. 15 ते 49 वर्षे वयोगटातील प्रत्येक स्त्रीच्या मृत्यूची नोंद करण्यात येणार आहे. हा मातामृत्यू असल्यास त्याची सविस्तर माहिती घेण्यात येणार आहे. मातामृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला आणि त्याचे नेमके कारण काय, याचा आढावा घेऊन, भविष्यात या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करणे या "मातामृत्यू अन्वेषण' कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आरोग्य खात्याच्या कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. उद्धव गावंडे यांनी "सकाळ'ला सांगितले.
ते म्हणाले, 'ग्रामीण भागातील स्त्रियांच्या मृत्यूच्या नोंदीवर जिल्हा शल्यचिकित्सक देखरेख करणार असून, शहरी भागात महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुखांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या सर्व रुग्णालयांमध्ये मृत्युमुखी झालेल्या स्त्रियांची नोंद होणार आहे.''
प्रसूती संबंधित वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. मातामृत्यूची माहिती भरण्यासाठी स्वतंत्र अर्ज तयार करण्यात आला आहे. त्यातून त्या घटनेची सविस्तर माहिती मिळेल. अशा घटनांचा दर महिन्याला आढावा घेण्यात यावा, असा आदेश देण्यात आला असल्याचे डॉ. गावंडे यांनी सांगितले. मृत्यूची माहिती कळल्यापासून चोवीस तासांमध्ये ही माहिती तालुका आरोग्याधिकाऱ्याला कळविणे बंधनकारक आहे. त्यानंतर ही माहिती तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक अशा सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. मातामृत्यू झाल्यापासून तीन आठवड्यांत संबंधित घरी जाऊन माहिती घेण्याच्या सूचना यात करण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.
मातामृत्यूचा प्रतिलक्ष दर 130!
महाराष्ट्रात सध्या एक लाख प्रसूतीमागे मातामृत्यूचा दर 130 आहे. या वर्षभरात हा मातामृत्यू दर 100 पर्यंत कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य खाते प्रयत्न करत आहे. त्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल, असे मत या क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.