सकाळ वृत्तसेवा
०७ ऑक्टोबर २०१०
मुंबई, भारत
मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्या जाव्यात यासाठी 2012 पर्यंत उपनगरात कूपर रुग्णालय, कांदिवली येथील शताब्दी आणि ट्रामा जोगेश्वरी ही तीन सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारण्याचा निर्धार पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी व्यक्त केला आहे.
कूपर रुग्णालयाचे काम सध्या 50 कोटी रुपयांतून सुरू आहे. त्यासाठी आणखी 50 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. हे रुग्णालय 520 खाटांचे असून त्यात आणखी 70 खाटांची वाढ केली जाणार आहे. जोगेश्वरी ट्रामा हे 265 खाटांचे रुग्णालय होईल. कांदिवली शताब्दी रुग्णालयात सध्या 120 खाटा आहेत. त्यात आणखी 180 खाटांची भर पडेल. ही तिन्ही रुग्णालये प्राधान्याने पूर्ण केली जातील. ही रुग्णालये 2012 पर्यंत सुरू होतील असा विश्वास म्हैसकर यांनी व्यक्त केला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात भगवती रुग्णालयाचे काम हाती घेतले जाईल. या रुग्णालयात सध्या 373 खाटा आहेत. त्या एक हजार इतक्या वाढविल्या जाणार आहेत. नर्सिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असलेल्या या रुग्णालयाचे काम मोठे आहे. त्याला पाच वर्षे लागतील. त्यासाठी 300 कोटी रुपये इतका खर्च येईल अशी माहिती म्हैसकर यांनी दिली.
या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये डायलिसिस, सीटीस्कॅन, एमआरआय आदी सुविधा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर सुरू केल्या जातील. "सेव्हन हिल्स'चा अनुभव लक्षात घेऊन आम्ही "पीपीपी'साठी अटी आणि शर्थीची अंमलबजावणी तंतोतंत होईल याकडे कटाक्षाने लक्ष देऊ, त्यासाठी नियंत्रण यंत्रणा ठेवू असेही त्यांनी सांगितले. मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी ही रुग्णालये उपयोगी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेतर्फे 2012 पर्यंत तीन सुपर स्पेशालिटी रुग्णालये
- Details
- Hits: 2680
0