सकाळ वृत्तसेवा
०३ ऑगस्ट २०१०
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत
शहरातून मलेरियाचे संकट दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणाऱ्या मुंबई महापालिकेने आता इंडियन मेडिकल असोसिएशनला मदतीची हाक दिली आहे. या हाकेला "ओ' देऊन "आयएमए'चे शहरातील दहा हजार डॉक्टर पालिकेच्या रुग्णालयामध्ये दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत बहुमूल्य मदत करणार आहेत. याबाबत उद्या (ता.4) पालिका अधिकारी व "आयएमए'च्या प्रतिनिधींची औपचारिक बैठक होणार असून येत्या आठवड्यामध्येच पालिका रुग्णालयातील दुपारच्या "ओपीडी' "आयएमए'च्या मदतीने सुरू होणार आहेत.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मलेरियाचा जोर वाढत आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये चाळीस हजारांहून अधिक रुग्णांना मलेरियाची लागण झाली आहे; तसेच यंदा मलेरियाच्या साथीची लक्षणेही बदलली असून त्यामागे वातावरणातील बदल, बदलती जीवनशैली, स्वच्छतेच्या सवयी या साऱ्या गोष्टी कारणीभूत आहेत, ताप असताना उद्भवणाऱ्या इतर गुंतागुंतीच्या व्याधींमध्ये कोणत्या प्रकारची उपाययोजना करावी, त्यासाठी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ कसा घ्यावा, आदी गोष्टींबाबत "आयएमए'च्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन पालिका रुग्णालयांना मिळू शकेल व आज शहरातील रुग्णांची वाढती संख्या व वैद्यक क्षेत्रातील अपुऱ्या मनुष्यबळाचा विचार करून "आयएमए'कडे मदतीसाठी विचारणा केल्याची माहिती शिवसेनेचे आमदार डॉ. दीपक सावंत यांनी "सकाळ' ला दिली. गोरगरीब रुग्णांसाठी केली जाणारी ही मदत संपूर्णपणे विनामूल्य असून त्यात कोणताही राजकीय स्वार्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या तज्ज्ञ डॉक्टरांनी मदत केल्यास मुंबईतील प्रत्येक भागांमधील रुग्णांना ही मदत उपलब्ध होऊ शकेल, कारण शहरांतील खासगी डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांचीही संख्या मोठी आहे. आयएमएप्रमाणेच "मेट्रोपॉलिस' "पिरॅमल' आणि "रॅनबॅक्सी' या पॅथालॉजीमध्येदेखील निकड भासल्यास रुग्णांच्या रक्ताचे नमुने मोफत तपासण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यापूर्वी पुण्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले असताना एएमआयने भरीव मदत केली होती. राज्य सरकार व पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला मदत करण्यासाठी "आयएमए' कायम तत्पर असल्याचे असोसिएशन्सच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. बकुलेश मेहता यांनी "सकाळ'ला सांगितले. शहरामध्ये दहा हजारांहून अधिक डॉक्टर असोसिएशन्सचे सदस्य आहेत, या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आरोग्ययंत्रणेला भक्कम मदत करणे हे वैद्यकीय व्यवसायातील प्रत्येकाचे आद्यकर्त्यव्य आहे, त्यामुळे गोरगरीब रुग्णांसाठी एकही रुपया न आकारता सर्व डॉक्टर पालिकेला संपूर्ण सहकार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मलेरियावर मात करण्यास "आयएमए' देणार हात
- Details
- Hits: 3253
0