सकाळ वृत्तसेवा
१२ ऑगस्ट २०१०
मुंबई, भारत
शहरांतील वाढते बांधकाम क्षेत्र, त्यावर काम करणारे मजूर, शहरांतील अस्वच्छतेमुळे मलेरिया वाढत असला, तरी आता राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण समितीने केलेल्या पाहणीतून काही ठोस निष्कर्ष हाती आले आहेत. कोलकत्ता, बेंगळूरु, दिल्ली अशा अनेक शहरांशी तुलना करता डासांची "राजधानी' मुंबई असल्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
मुंबईमध्ये मलेरियाची साथ इतक्या वेगाने कशी फोफावली, त्याची मूळ कारणे काय आहेत याचा शोध घेण्यासाठी काही दिवासांपूर्वी केंद्राकडून एक विशेष पथक मुंबईत पाहणीसाठी आले होते. या पथकाने आरोग्यतज्ज्ञांकडे सादर केलेल्या या अहवालामध्ये मुंबईमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांमध्ये 55 टक्के वाढ झाली आहे. तसेच एप्रिल 2009 आणि जून 2010 या काळाशी तुलना करता फाल्सिफेरम प्रकारातील मलेरियाचा प्रादुर्भाव 15 टक्क्यांनी वाढलेला दिसून आला आहे. 2009 मध्ये पालिकेने मेट्रो रेल्वेच्या कामामुळे 135 ठिकाणी या डासांची उत्पत्तीस्थळे निर्माण होतील असा धोका स्पष्ट केला होता. त्यानुसार यंदाही नव्या 147 ठिकाणी या डासांचा अड्डा असल्याचे दिसले आहे.
पालिकेच्या आकडेवारीनुसार 1 जूनपासून मुंबईमध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या 19,500 नोंदवली गेली. त्यातील 33 टक्के केस या शिवडी, महालक्ष्मी, भायखळा, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, रे रोड, माहीम कॉजवे, धारावी, एअरपोर्ट, सांताक्रूझ, विक्रोळी या भागांतील होत्या. या ठिकाणी बांधकाम वेगाने सुरू असल्यामुळे साठलेले पाणी, अस्वच्छता या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन मलेरियाची साथ वेगाने पसरत गेली. बांधकाम क्षेत्रातील ज्या मजुरांचे रक्ततपासणी नमुने घेण्यात आले, त्यापैकी 83 टक्के मजुरांना मलेरियाची लागण झाल्याचे दिसून आले. केंद्राने पाठविलेल्या या तपासणी पथकाला मुंबईतील बांधकाम क्षेत्रामध्ये साठलेले पाणी आणि पाऊस ही दोन्ही कारणे मलेरियाचा प्रादुर्भाव होण्यास अधिक महत्त्वाची वाटत असल्याचे आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. आर. व्ही. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे. इतर राज्यांमध्ये डासप्रतिबंधक योजना ही शासनाकडून राबविली जाते, बांधकाम व्यावसायिकांकडून नव्हे; त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी ही योजना राबविणे सक्तीचे करणेही या समितीस योग्य वाटत नाही.