सकाळ
२५ मे २०१०
नागपूर, भारत
मनाचे योग्य पोषण आणि संवर्धन केल्यास मनोरोग टाळता येतो. याकरिता सर्वस्तरावर समुपदेशन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रूपाताई कुळकर्णी यांनी येथे केले.
सिझोफ्रेनिया या गंभीर आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या डे केअर सेंटर विभागात आयोजित सिझोफ्रेनिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यागत समितीचे सदस्य बी. ए. साठे, पी. के. नगराळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. एस. चंगोले, उपअधीक्षक डॉ. सुलेमान विराणी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गुल्हाने, डॉ. अभय छल्लानी, डॉ. प्रवीण नवखरे उपस्थित होते. डॉ. रूपा कुळकर्णी यांनी सुधारलेल्या स्त्री मनोरुग्ण व समाजाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि आपल्या भाषणात मनुष्यांचे जीवनात मनाचे महत्त्व विषद करताना धम्म पदातील पहिल्या सूत्राचा दाखला दिला.
अभ्यागत समिती सदस्य प्रदीप नगराळे यांनी मनोरुग्णांना सुधारल्यावर समाजात परतताना आपुलकी मिळायला हवी. त्याचा समाज व कुटुबीयांनी स्वीकार करावा यासाठी अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
बी. ए. साठे यांनी सुधारलेल्या मनोरुग्णांना व्यावसायिक आयुष्यात परतताना येणाऱ्या अडचणीवर प्रकाश टाकला. या अडचणी दूर करण्याकरिता त्यांच्या कामाच्या असलेल्यांना योग्य समुपदेशन व मार्गदर्शन व्हावे असेही सांगितले. प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये यांनी सुधारलेल्या मनोरुग्णांना समाजातील मुख्य प्रवाहात सामील होण्याकरिता शासनस्तरावर सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच सुधारलेल्या मनोरुग्णांकरिता पुनर्वसन योजना जिल्हास्तरीय असावी अशी कल्पना मांडली, जेणे करून मनोरुग्णांना त्यांच्या स्थानिक क्षेत्रात पुनर्वसित होता येईल. दरम्यान, सुधारलेल्या स्त्री रुग्णांची अनेक वर्षांपासून काळजी घेणारे हरीशचंद्र तेलरांधे यांचा सत्कार डॉ.
रूपाताई कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन अनघा राजे यांनी तर आभार नीता पुरंदरे यांनी मानले. केवल शेंडे, अरुण धोंगडे, मोहम्मद अफसर, राजकुमार ठाकूर, चंद्रशेखर सहारे, कैलाश बैस्वारे, लीला मार्टिन यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले.
मनोरोग टाळण्यासाठी सर्वस्तरावर समुपदेशन हवे
- Details
- Hits: 3393
0