सकाळ वृत्तसेवा
२४ मे २०१०
पुणे, भारत
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात तीस टक्के रुग्ण हे दीर्घकालीन उपचार घेत आहेत. या रुग्णांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून, त्यासाठी रुग्णालयाच्या आवारात असलेल्या एका इमारतीमध्ये विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण केंद्रासह उत्पादन केंद्र उभारणार असल्याचे अधीक्षक डॉ. मनोहर यादव यांनी सांगितले.
डॉ. यादव म्हणाले, रुग्णालयात सध्या 1800 ते 1900 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील अंदाजे सहाशे बरे झालेले रुग्ण आहेत. काही रुग्ण अनाथ आहेत, तर काहींच्या नातेवाइकांचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयातच राहावे लागत आहे. या रुग्णांना स्वतंत्र एका इमारतीमध्ये ठेवून, विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचा मनोदय आहे. या प्रशिक्षणातून उत्पादित होणाऱ्या वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. त्यात शासकीय कार्यालयांना लागणाऱ्या फाईल्स, सतरंजी, फिनेल, लिक्विड सोप, स्टेशनरी आदी वस्तूंचा समावेश असेल. तसेच, रुग्णालयाच्या आवारातदेखील या वस्तूंच्या विक्रीसाठी केंद्र उघडले जाणार असून, यातून मिळणारी रक्कम ही संबंधित रुग्णांच्या नावे बॅंकेत जमा केली जाणार आहे.
काही रुग्णांना रुग्णालयाच्या बाहेरदेखील कामाची संधी दिली जाणार असून, पूर्णत: बरे झालेल्या रुग्णांची रुग्णालयातच निवास आणि भोजनाची सोय केली जाईल. ते दिवसातील ठराविक तास बाहेर काम करून येतील. रुग्णांसाठी नियमित औषधोपचारासोबतच संगीतोपचार, मनोरंजन, खेळ आदींची सोय केली जाणार आहे. अशा प्रकारे बरे झालेल्या रुग्णांचे रुग्णालयातील आवारातच पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी इमारत तयार असून, राज्य सरकारची परवानगी आणि अल्पशा निधीची गरज असल्याचे यादव यांनी सांगितले.
मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद कमी
मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींना आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यास म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. रुग्णाला संस्थेत घेऊन गेल्यावर ते हिंसक होणार नाहीत, याची खात्री देता येत नसल्याचे कारण संस्थांनी पुढे केले असल्याचे डॉ. मनोहर यादव यांनी सांगितले.
मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी प्रशिक्षण केंद्र उभारणार
- Details
- Hits: 2965
0