सकाळ न्यूज नेटवर्क
१६ मे २०१०
नवी दिल्ली, भारत
आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घेणाऱ्या मधुमेहाच्या टाइप वन 1'च्या रुग्णांना शास्त्रज्ञांनी आशेचा किरण दाखविला आहे. मधुमेहाला (टाइप-वन) एका आठवड्यापेक्षा कमी काळात रोखू शकणारे औषध विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. रुग्णाच्या शरीरातील इन्शुलिन निर्मिती करणारी नैसर्गिक क्षमता हे औषध अनेक वर्षे कायम ठेवू शकते.
"ओटलिझिझुमॅब' असे या औषधाचे नाव आहे. रुग्णाच्या स्वादुपिंडांची हानी रोखण्याचे काम करून इन्शुलिन निर्मितीला ते चालना देते. स्वादुपिंडातील बिटा सेल्स' पूर्णपणे नष्ट होण्यापूर्वी या औषधाचा डोस रुग्णाला दिला गेला, तर मधुमेह (टाइप-वन) रोखला जाऊ शकतो, अशी माहिती येथील फोर्टिस' रुग्णालयाच्या मधुमेह विभागाचे प्रमुख डॉ. अनुप मिश्रा यांनी दिली आहे. सध्या मधुमेहाच्या "टाइप-वन'च्या रुग्णांपुढे इन्शुलिनची इंजेक्शन घेण्याखेरीज दुसरे कोणतेही उपचार उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
स्वादुपिंडातील बिटा सेल्स' नष्ट करणाऱ्या टी इफेक्टर सेल्स'चे कार्य थांबविण्याचे काम ओटलिझिझुमॅब' करू शकते. टी सेल्स' शरीरातील पेशी आणि अवयवांवर नियमित हल्ला करीत असतात. टाइप वन मधुमेह मुख्यत्वेकरून तरुणांमध्ये आढळून येतो. रक्तातील ग्लुकोज'च्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्शुलिनची निर्मिती करण्यात स्वादुपिंड अपयशी ठरल्यानंतर रुग्णाला टाइप वन' मधुमेह होतो. या मधुमेहाचे निदान झाल्यानंतर तातडीने हे औषध दिले गेले तर ते जास्त परिणामकारक ठरते, असे निरीक्षणही शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. सध्या या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत.
मधुमेह आठवडाभरात रोखणे शक्य
- Details
- Hits: 4003
0