सकाळ वृत्तसेवा
१७ मे २०१०
सावंतवाडी, भारत
गॅंगरीनसारख्या गंभीर आजारामुळे शरीराचा एखादा अवयव कापून टाकण्याची वेळ आता मधूमेहींवर येणार नाही. व्हॅस्क्युलर अँजिओप्लास्टी उपचार पद्धतीमुळे हे सहज शक्य झाले आहे, असे गोव्यातील अपोलो हॉस्पिटलचे निष्णात हृदयरोगतज्ज्ञ बिजू इफ्रम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
गोड खाण्यावर बंदी असलेल्या मधुमेही रुग्णांसाठी ही गोड बातमी असल्याचा निर्वाळा देत डॉ. बिजू म्हणाले, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास किंवा त्यातून पुढे गॅंगरीनसारखा गंभीर आजार उद्भवल्यास एखादा अवयवच कापून टाकण्याची वेळ रुग्णांवर येत होती. आता अँजिओप्लास्टी आणि स्टेन्टींगचा अंतर्भाव असलेल्या व्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शन पद्धतीने हे अडथळे काढून टाकून रक्तपुरवठा पूर्ववत सुरू करता येणार आहे. त्यामुळे रक्तपुरवठ्याअभावी शरीराचा अवयव कुजण्याची शक्यता दुरावली आहे. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रियाही यासाठी करावी लागणार नाही.
व्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शन अँजिओप्लास्टीमुळे रुग्णाला संपूर्णपणे भूल देण्याची गरज पडणार नाही, या उपचार पद्धतीसाठी रुग्णाला इस्पितळात फारतर एखाद्दुसरा दिवस राहावे लागेल. या रुग्णांना एरवी मधुमेह, हृदयरोगासारखे गंभीर आजार असतात. त्यामुळे यात बायपास शस्त्रक्रियेदरम्यान, जीवाला होणारा धोका टाळता येईल. या पद्धतीत कोणतीही चिरफाड होत नसल्याने रुग्णही लगेचच कामावर रुजू होऊ शकतो. विशेष म्हणजे या उपचारपद्धतीत रुग्णाला कोणथ्याही वेदना होत नाहीत, असेही डॉ. बिजू यांनी सांगितले.
भारतात साधारणतः 4 कोटी 9 लाख मधुमेहाचे रुग्ण आहेत, म्हणजेच जवळपास 8 कोटी 18 लाख पाय या आजाराने प्रभावीत असतात. जवळपास निम्मे रुग्णांचे पाय काढावे लागतात. अशावेळी अशा प्रकारच्या आजारात रुग्णाने वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधल्यास या उपचार पद्धतीने त्याचा पाय वाचविता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले व आपण विविध रुग्णांवर केलेल्या या पद्धतीच्या उपचारांची स्लाईड-शोद्वारे माहिती दिली.
चालल्यानंतर पाय दुखणे, पायात मुंग्या येणे, झालेल्या जखमा लवकर बऱ्या न होणे अशी या रोगाची लक्षणे असल्याचे सांगून अशावेळी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपचारासाठी येणाऱ्या खर्चाबाबत विचारता साधारणतः 1 लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.