सकाळ वृत्तसेवा
०४ जुन २०१०
मुंबई, भारत
ब्लॅकबेरी-व्होडाफोनच्या सहकार्याने मास्ट्रोस मेडीलाईन सिस्टीम्स लिमिटेडने ग्राहकांसाठी "ई उनो आर 10' ही ईसीजीसंबंधित इलेक्ट्रोकार्डिओग्राम आरोग्य सुविधा मोबाईलवर देणारी सेवा आजपासून सुरू केली.
देशात पहिल्यांदाच सुरू होणाऱ्या या सुविधेचा प्रारंभ सर्वप्रथम नानावटी रुग्णालयात होणार असून नानावटी रुग्णालयाशी ई उनो आर 10 सेवा संलग्न राहणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. आज व्होडाफोनचे कुमार रामनाथन, ब्लॅकबेरीच्या फ्रेनी बावा, मास्ट्रोसचे डॉ. कृष्णकुमार मेनन व नानावटीचे डॉ. पवन कुमार यांच्या उपस्थितीत या आरोग्यसुविधेचा प्रारंभ करण्यात आला.
हृदयविकारासाठी आवश्यक असलेल्या आरोग्यसुविधा तात्काळ उपलब्ध होणे आवश्यक असते. याच संकल्पनेतून ही मोबाईल सेवा सुरू करण्याचा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला, असे मेनन यांनी सांगितले. यातील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना त्यांचे ईसीजी रिपोर्टस्ही मोबाईलवर सहजपणे उपलब्ध होऊ शकतील, असे डॉ. पवन कुमार यांनी सांगितले.