सकाळ वृत्तसेवा
१३ ऑगस्ट २०१०
राहुल गडपाले
मुंबई, भारत
रुग्णाच्या आजाराचे निदान करण्यापूर्वी पॅथॉलॉजीविषयक वेगवेगळ्या चाचण्या करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात असल्यामुळे गेल्या काही वर्षांत पॅथॉलॉजी चाचण्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मात्र, अलीकडे अनेक पॅथॉलॉजी लॅबोरेटरींमधील कर्मचारी संबंधित चाचण्या करण्यासंदर्भात कितपत प्रशिक्षित आहेत, याबाबतच शंका उपस्थित केल्या जात आहेत. "मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी'चे प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे 70 टक्के संस्था बोगस असल्याने त्यामधून तयार होणाऱ्या तंत्रज्ञांवर कितपत भरवसा ठेवावा, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
राज्यात मुंबई तंत्रशिक्षण मंडळातर्फे चालविण्यात येणारा "डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी' आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमावर "मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन' हे दोनच वैध अभ्यासक्रम आहेत. मात्र, या व्यतिरिक्त अनेक खासगी संस्थांनी राज्यभर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट स्थापन करून या शास्त्राला हरताळ फासण्याचा प्रयत्न चालविला आहे. अगदी 30 दिवसांपासून ते वर्षभराच्या कालावधीत काही हजार रुपयांमध्ये "डीएमएलटी'च्या पदविका वाटण्याचा प्रकार सर्रास सुरू असून, यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे अशा संस्थांमधून थातुरमातूर शिक्षण घेऊन "डीएमएलटी'ची पदविका घेणारे विद्यार्थी लहान-मोठ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतात. त्यामुळे अशा लॅबमधून विविध चाचण्या कितपत नेमकेपणाने होत असतील, याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. केंद्राची आणि राज्यातील "एफडीआय'ची पथके तपासणीसाठी फिरत असली, तरी त्यांच्या दौऱ्यांचा सुगावा संबंधित लॅबना अगोदरच लागत असल्याने या कारवाईचा फारसा परिणाम होताना दिसत नाही.
पात्रतेचे नियमही डावलले
"डीएमएलटी' हा विज्ञान शाखेशी संबंधित विषय असल्यामुळे याच शाखेतून 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, केवळ मुंबई तंत्रशिक्षण मंडळाच्याच अभ्यासक्रमांमध्ये हा नियम पाळला जातो. बोगस संस्थांमध्ये अगदी कला शाखेतून 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाही प्रवेश देण्यात येतो. विशेष म्हणजे, वैद्यकशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या विषयाकरिता किमान तीन वर्षांचा अभ्यासक्रम व एक वर्ष इंटर्नशिप बंधनकारक असतानाही 30 दिवस ते एक वर्षांच्या कालावधीचेही अभ्यासक्रम काही संस्थांनी सुरू केले आहेत. काही ठिकाणी तर याकरिता फक्त सुटीच्या दिवशीच दोन तास वर्ग चालविण्यात येतात.
"डीएमएलटी'विरुद्ध "एमडी' वाद
फक्त पॅथॉलॉजीमध्ये "एमडी' केलेल्या डॉक्टरांनाच पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दोन वर्षांपूर्वी एमडी डॉक्टरांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती; परंतु हा एक प्रकारचा स्वयंरोजगार असल्याने "डीएमएलटी'धारकांनाही या व्यवसायाचा हक्क आहे, असे सांगत न्यायालयाने एमडी डॉक्टरांची याचिका फेटाळून लावली होती; परंतु तरीही अनेक ठिकाणी "एमडी विरुद्ध डीएमएलटी' असा वाद सुरूच आहे. त्यामुळे मध्यंतरी रुग्णांतही या विषयात शंका उपस्थित झाल्याने कुणीही एमडी झालेल्या डॉक्टरकडूनच तपासणी करून घेण्यास अधिक इच्छुक असतात. त्यामुळे डीएमएलटी पदविकाधारकांच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला कमी प्रतिसाद मिळतो.
ऍडमिशनसाठी नोकरीचे आमिष
अगदी पाच हजारांपासून ते 50 हजारांपर्यंत फी आकारून अनेक खासगी संस्थांत डीएमएलटी अभ्यासक्रम शिकविला जातो; परंतु राज्यात फक्त मुंबई तंत्रशिक्षण मंडळ व किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) या दोनच अभ्यासक्रमांना राज्य शासनाची परवानगी आहे. तसेच हे अभ्यासक्रम केल्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप करणे बंधनकारक आहे. ती पूर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्याला स्वतःची पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी नोंदणीकृत केले जाते. मात्र, बाहेरच्या विद्यापीठांच्या नावाने सुरू असलेल्या अनेक खासगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमधून नोकरीचे आमिष दाखवून प्रवेश दिला जातो. काही ठिकाणी विद्यार्थ्याला "ऑन जॉब ट्रेनिंग'चेही आश्वासन दिले जाते. मात्र, इतर ठिकाणी नोकरी शोधताना किंवा सरकारी खात्यात नोकरी मिळविताना अशा विद्यार्थ्यांची दमछाक होते. सरकारी नोकरी करायची असेल तर डीएमएलटी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यानंतर मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी या विषयातून बीएस्सी पूर्ण करण्याची गरज पडते.
रुग्णांच्या आयुष्याशी खेळ का?
मुंबईसह राज्यभरात बाहेरच्या विद्यापीठांच्या नावाने अनेक संस्थांनी "डीएमएलटी'ची प्रशिक्षण केंद्रे उभारली आहेत. यातून त्यांचा आर्थिक उद्देश साध्य होत असला तरीही तेथे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना बाहेर नोकरी शोधताना त्रास होतो. अशा संस्थांत प्रशिक्षण घेतलेले हजारो तंत्रज्ञ सध्या पॅथॉलॉजीत काम करीत आहेत. काही जणांनी स्वतःच्या लॅबोरेटरीही थाटल्या आहेत. मात्र, अशा पद्धतीने अर्धवट शिक्षण घेतलेल्यांकडून आपल्या आजाराचे योग्य निदान होत असेल का, याबाबत रुग्ण आणि डॉक्टरांच्याही मनात शंका उपस्थित होत आहेत. यामुळे रुग्णांच्या आयुष्याशी खेळ का, असा प्रश्नही उभा राहिला आहे.
तज्ज्ञ फक्त अनुभवानेच!
एकीकडे बोगस संस्थांमधून पैशाच्या जोरावर पदविका मिळवून काम करणाऱ्यांच्या कामाबाबत शंका व्यक्त केली जात असताना दुसरीकडे काही पॅथॉलॉजी लॅबोरेटरीजमध्ये कुठल्याही प्रकारचे वैद्यक शास्त्राचे प्रशिक्षण वा अभ्यासक्रम पूर्ण न केलेल्या व्यक्तीही काम करताना दिसतात. विशेष म्हणजे, शहरांमधील अनेक जुन्या आणि मोठ्या पॅथॉलॉजीमध्ये अशा प्रकारचे तंत्रज्ञ काम करताना दिसतात. मात्र, या व्यक्ती प्रशिक्षित नसल्या तरी अनेक वर्षांच्या अनुभवाच्याच जोरावर या प्रशिक्षित तंत्रज्ञांपेक्षा चांगले काम करतात. कारण, हे अनुभवातून तयार झालेले तज्ज्ञ असतात, असे मत एका लॅबोरेटरी चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.