सकाळ वृत्तसेवा
२८ मे २०१०
बिलोली, भारत
सेवा वैधता प्रमाणपत्र नसतानाही विविध गंभीर आजारांवर उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांनी तत्काळ प्रॅक्टिस बंद करावी, अन्यथा कारवाईला सज्ज राहावे, असा इशारा तालुका आरोग्य अधिकारी बी. एम. मिरकुटे यांनी लेखी स्वरूपात तालुक्यातील बोगस डॉक्टरांना दिला.
तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचे वृत्त सकाळ'मधून प्रकाशित होताच त्यांनी लेखी आदेश निर्गमित केले. तहसीलदार बी. डी. आत्राम यांनी बोगस डॉक्टरांच्या शोध मोहिमेसाठी शुक्रवारी (ता. 28) दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयात वैद्यकीय अधिकारी, नगरसेवक व अन्य अधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन केले आहे.
बिलोली तालुक्यातील शहर व ग्रामीण भागांत बोगस डॉक्टरांनी वैधता प्रमाणपत्र नसतानाही गंभीर आजारांवर उपचार करून रुग्णांची आर्थिक व शारीरिक शोषण करीत असल्याचे दिसून येत आहे. शहरी व ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांना आळा घालण्याच्या हेतूने जिल्हा स्तरावरून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. बिलोली तालुक्यात वैधता प्रमाणपत्र नसणाऱ्या; मात्र रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या 40 पेक्षा अधिक आहे, अशा डॉक्टरांकडील कागदपत्रांची यापूर्वी छाननी करण्यात आली, शिवाय त्यांना गंभीर व आपल्या कक्षेबाहेरील आजारांवर उपचार न करण्याची तंबी दिली आहे. याकडे दुर्लक्ष करून काही जणांनी ग्रामीण भागातील अज्ञानी जनतेच्या जीविताशी खेळत असल्याचे समजले.
तालुक्यातील नोंदणी नसलेल्या; परंतु उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे काही रुग्णांना रिऍक्शन' झाल्याच्या तक्रारी होत्या. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टरांना याबद्दल सूचनाही केल्या होत्या. याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराचा फटका ग्रामीण भागातील अज्ञानी, अशिक्षित रुग्णांना बसत असल्याने सकाळ'मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची दखल घेऊन तालुका आरोग्य अधिकारी बी. एम. मिरकुटे यांनी तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गतच्या बोगस डॉक्टरांना उपचार करणे बंद करण्याचे आदेश दिले. ज्या डॉक्टरांकडे बीएएमएस व समप्रमाणातील वैद्यकीय प्रमाणपत्र असतील, अशांनी आपल्या कक्षेत राहून उपचार करावे, अन्यथा चुकीच्या पद्धतीचा अवलंब केल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले.
आज बैठक
बिलोली तालुक्यातील बोगस डॉक्टरांच्या वृत्ताची दखल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनीही घेतली असून, बोगस डॉक्टरांची शोधमोहीम राबविण्याचे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी शुक्रवारी बोगस डॉक्टरांची शोध घेण्यासाठी बैठक बोलावली आहे.