सकाळ वृत्तसेवा
२७ मे २०१०
लोणी काळाभोर, भारत
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सकाळी साडेआठ वाजता सुरू होणे कायद्याने बंधनकारक असताना, उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा बाह्यरुग्ण विभाग तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सोईनुसार म्हणजे सकाळी अकरानंतर केव्हातरी चालू होत असल्याची बाब पुढे आली आहे.
जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, हवेली पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. पी. राऊत यांच्यासमवेत सोमवारी (ता. 24) उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता वरील प्रकार उघडकीस आला आहे. बाह्य रुग्ण विभाग सुरू होण्यापूर्वी म्हणजेच सकाळी साडेआठ वाजण्याच्या पूर्वी काही वेळ तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होणे होणे अपेक्षित असताना, वीसपैकी केवळ तीनच कर्मचारी वेळेवर आल्याचे आढळून आले. वीसपैकी तीन जण गैरहजर होते, तर दोन जण रात्रपाळी करून घरी होते. उर्वरित कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी काम करणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकारी अकरानंतर कामावर आल्याचे आढळून आले.
याबाबत डॉ. राऊत म्हणाले, 'उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे दोन वैद्यकीय अधिकारी व तब्बल 12 कर्मचारी उशिरा आल्याची बाब खरी आहे. सकाळी साडेआठ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर राहणे गरजेचे असताना, या ठिकाणचे बहुसंख्य कर्मचारी उशिरा येत असल्याची बाब खरी आहे. हा प्रकार रोजच घडत असल्याची कबुली खुद्द कर्मचाऱ्यांनीच दिली असून, उशिरा येणाऱ्यात दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याबाबतचा अहवाल आपण आजच वरिष्ठ कार्यालयात देणार असून, उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करणार आहे.''
उशिरा येणाऱ्यांना निलंबित करा
जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन याबाबत म्हणाले, शासन सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महागड्या होत चालल्याने सर्वसामान्य नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात अल्पदरात उपचार होईल, या आशेने येत असतात. सकाळी साडेआठ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्राचा बाह्यरुग्ण विभाग चालू करणाऱ्या आरोग्य विभागाच्या सूचना असतानाही, उरुळी कांचनसारख्या गावात हा प्रकार घडणे दुर्दैवी आहे. अकरा वाजेपर्यंत खुद्द वैद्यकीय अधिकारीच येत नसल्याने, या ठिकाणी काम करणारे कर्मचारीही मनमानी करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. उशिरा येणाऱ्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच सर्वच कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करुण त्याच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
कडक कारवाई करणार
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत चव्हाण म्हणाले, 'उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबतचा अहवाल मिळाला आहे. कामावर उशिरा येणाऱ्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तेथील 13 कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची शिफारस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात येणार असून, त्याची शासकीय सेवासमाप्ती का करू नये, अशा आशयाच्या नोटिसा त्यांना देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात असे प्रकार घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही आरोग्य खात्याला देण्यात आल्या आहेत.