Print
Hits: 3280

सकाळ वृत्तसेवा
२२ मे २०१०
नवी मुंबई, भारत

तापत्या उन्हात गारव्याचा आधार घेण्यासाठी बहुतेक जण रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीवरचा बर्फाचा गोळा खाण्यासाठी, फळांचा रस, सरबत पिण्यासाठी गर्दी करू लागले आहेत; परंतु सरबतासाठी वापरण्यात येणारे रंग दर्जेदार नसतात; तसेच पाणीही शुद्ध नसल्याने शहरात गॅस्ट्रो आणि काविळीच्या साथीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.

रस्त्यावर, रेल्वेस्थानक आणि बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांवर बर्फाचे गोळे खाण्याचा आणि सरबत पिण्याचा मोह उन्हाळ्यामुळे होत असतो. बच्चे कंपनी बर्फाचा गोळा खाण्यासाठी हट्ट धरत असतात. काही जण कौतुकाने मुलांना हे गोळे खायला देत असतात. बाटल्यांमधील रंगीबेरंगी सरबत पाहून मोठ्यांना बर्फाचा गोळा खाण्याचा किंवा सरबत पिण्याचा मोह होत असतो. गाड्यांवरील ही सरबते बहुतांशी झोपडपट्ट्यांमध्येच बनविली जातात. ती बनविताना स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. अनेक वेळा दूषित पाणी, निकृष्ट दर्जाच्या रंगांचाही वापर होत असतो. बऱ्याच वेळा प्रसाधनगृहातील नळाच्या पाण्याचा वापर सरबतांसाठी केला जातो. गोळा बनविण्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ बारदानात गुंडाळून ठेवण्यात येतो. हे बारदानही अस्वच्छ असते. त्यामुळे या सरबतांच्या आणि बर्फाच्या गोळा बनविणाऱ्या गाड्या आता आजाराला आमंत्रण ठरत आहेत. या गाड्यांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सरबतांची तपासणी होत नाही. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो आणि काविळीसारख्या आजारात वाढ होऊ लागली आहे. तापाच्या रुग्णापेक्षा सध्या गॅस्ट्रो आणि काविळीचे रुग्ण अधिक असल्याचे खासगी डॉक्‍टरांनी सांगितले. यात लहान मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात येते. दूषित पाण्याबरोबर उघड्यावरील अन्नपदार्थ खाण्याच्या सवयीमुळे आजारात वाढ होत आहे. पावसाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यातही गॅस्ट्रो आणि काविळीच्या साथीची मोठ्या प्रमाणात वाढ होते.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.