Print
Hits: 3619

सकाळ वृत्तसेवा
२२ सप्टेंबर २०१०
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत

माणसांप्रमाणेच आता प्राण्यांमध्येही किडनीच्या व्याधींचे प्रमाण वेगाने वाढत असल्यामुळे त्यांनाही अत्याधुनिक वैद्यकीय उपचार देण्यासाठी मुंबईच्या दिनशा पेटीट पशुवैद्यकीय रुग्णालयाने डायलिसीस सेंटर सुरू केले आहे. 70 किलो वजनापर्यंतच्या कोणत्याही व्याधीग्रस्त प्राण्याचे येथे डायलिसीस करता येणार आहे. त्यासाठी जपानहून विकसित यंत्रसामग्री आणण्यात आली असून, पाळीव कुत्रे, मांजरी, गाई यांच्या डायलिसीससाठी असणारी वेटिंग लिस्टही येथे खूप मोठी आहे.

शहरवासीयांच्या बदलत्या जीवनशैली व आहारशैलीचा परिणाम आता या पाळीव प्राण्यांवरही खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यापूर्वी दम्यासारखा आजार हा प्राण्यांकडून माणसाला होत असल्याचे दिसून आले होते; मात्र आता अनेक पाळीव प्राण्यांमध्ये साथीच्या आजारांची लागणही माणसांकडूनच होत असल्याचे दिसत आहे.

बदलती आहारशैली हे किडनीच्या व्याधींचे प्रमाण वेगाने वाढत जाण्याचे प्रमुख कारण असल्याचे दिनशा पेटीट पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. राजीव गायकवाड सांगतात. ज्यांच्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनविले जात नाहीत, त्या घरांतून पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांना सक्तीने शाकाहारच करावा लागतो, त्या प्राण्याची मूळ अन्नगरज डावलली गेल्याने त्याच्या शरीरास आवश्‍यक जीवनसत्त्वे मिळतातच असे नाही; याउलट मांसाहाराला प्राधान्य देणारी मंडळी कच्चे किंवा अतिरिक्त मांस या प्राण्यांना खाऊ घालतात, त्याचाही परिणाम प्राण्यांच्या पचनसंस्थेवर होतो. प्राण्यांसाठी बनविण्यात येणाऱ्या "पेट फूड'चे फॅड वेगाने फोफावत असले तरीही ते टिकविण्यासाठी वापरण्यात येणारे घटक, रसायने यांचे दुष्परिणाम प्राण्यांवर प्रकर्षाने दिसून येतात. दूषित पाण्यातून डायरिया, कॉलरा, कावीळ यासारख्या व्याधीही आता वारंवार उद्‌भवताना दिसू लागल्या आहेत. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रे, मांजरी यांचे सरासरी आयुष्य 10 वर्षांचे मानले जाते. आता ते घटण्याच्या प्रमुख कारणांमध्ये किडनी निकामी होणे हे महत्त्वपूर्ण कारण पुढे येत आहे. या प्राण्यांमध्ये किडनी प्रत्यारोपणाची सुविधा अद्याप उपलब्ध नसली तरीही पूर्ण रक्ताचे शुद्धीकरण करून डायलिसीस सेवेच्या माध्यमातून त्यांचे आयुर्मान वाढविण्याचे प्रयत्न या केंद्राच्या मदतीने निश्‍चित केले जाणार आहेत.

रक्तदानासाठीही हवेत दाते
अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची कास धरून येथे डायलिसीस सेंटर सुरू करण्यात आले असले तरीही राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या जखमी प्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी रक्ताची खूप मोठ्या प्रमाणात निकड असते. प्राण्यांचे रक्तगट डीए, 1, 1.1, 1.2, 1.3, 7 असे प्रामुख्याने मानले जातात. त्यांच्या विविध प्रजातींनुसार रक्तगटही भिन्न असतात. अपघातामध्ये सापडलेल्या, जखमी अवस्थेमधील या प्राण्यांना रक्ताची तातडीने निकड निर्माण झाल्यास त्यांना रक्त देता यावे यासाठी प्राण्यांना घेऊन, त्यांच्या मालकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येते; पण त्यास अत्यल्प प्रतिसाद लाभतो. त्यामुळे उपलब्ध रक्तामधील काही समान गुणधर्म शोधून, तो रक्तगट इतर प्राण्याच्या रक्तगटाशी जुळविणे, असा मध्यम मार्ग डॉक्‍टर अवलंबितात. माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही नवे रक्त दर तीन महिन्यांनी तयार होत असतेच. त्यामुळे अधिकाधिक पेट ओनर्सनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

प्राण्यांचे भावनिक विश्‍वही जपा!
उच्च रक्तदाबापासून मधुमेहापर्यंतच्या अनेक तक्रारी प्राण्यांमध्ये दिसू लागल्या असल्या तरीही भोवतालच्या वातावरणातील बदल, पर्यावरण, घरातील कलह यांचा प्रभाव प्राण्यांच्या भावविश्‍वावरही दिसतो. घराशेजारी चालू असणाऱ्या बांधकामांचा मोठा आवाज, दिवाळीत फटाक्‍यांचे आवाज, सातत्याने होणारी भांडणे, गाड्यांची वर्दळ यांमुळे कुत्र्यांसारखे प्राणी चिडखोर होतात; तर मनीमाऊ घरामध्ये एकाच खोलीत दबा धरून बसते. वावर असणाऱ्या घरातील मंडळींचा बाहेरचा राबता वाढला, की प्राणी एकलकोंडे होतात. म्हणूनच प्राण्यांच्या आरोग्याच्या विविध तक्रारींसोबतच त्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठीही आता विविध उपक्रम हाती घेतले जाऊ लागले आहेत.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.