सकाळ वृत्तसेवा
१९ मे २०१०
नागपूर, भारत
उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघणाऱ्या पूर्व विदर्भात पाण्याची पातळी खाली गेल्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे साथरोगांचा विळखाही वाढत आहे. अवघ्या चार महिन्यांत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत चार हजारांवर गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक दूषित पाणी नागपुरात आढळून आले आहे. मार्च महिन्याअखेरीस 21 टक्के पाण्याचे नमुने दूषित होते. गॅस्ट्रोच्या साथीसह कावीळ अन डायरियाही आहे. नागपूर शहरात काविळीचे 40 रुग्ण आढळले आहेत.
नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 4 हजार 200 रुग्णांची नोंद झाली असून गॅस्ट्रोचे थैमान गडचिरोली जिल्ह्यात अधिक आहे. तेथे एक हजार 406 रुग्णांची नोंद जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आहे. गॅस्ट्रोच्या संख्येत गडचिरोलीमध्ये वाढ झाली असली तरी दूषित पाण्याचे प्रमाण मात्र केवळ 10.40 टक्के आहे. 692 नमुने तपासले असून यापैकी 72 नमुने दूषित आढळले आहेत.
यापाठोपाठ वर्धा जिल्ह्यात एक हजार 65 रुग्णांची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात 600 तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 439 गॅस्ट्रोग्रस्तांची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. केवळ 36 रुग्ण आढळले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 131 गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले. गॅस्ट्रोसोबत डायरिया आणि काविळीच्या आजारातही झपाट्याने वाढ झाली आहे. विभागात डायरियाचे पाच हजारांवर रुग्ण आढळले आहेत. तर काविळीचे 70 रुग्ण आढळले आहेत. यात नागपूर शहरातील 40 रुग्णांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 11 काविळीचे रुग्ण आढळले. गोंदिया जिल्ह्यामध्ये काविळीचा रुग्ण आढळून आला नाही, अशी नोंद आरोग्य विभागाजवळ आहे.
नागपुरात शहरातील विविध वस्त्यांमध्ये दोन हजार 304 पाण्याचे नमुने तपासण्यात आले. प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या या नमुन्यात 501 नमुने दुषित निघाले. 21.74 टक्के दूषित असल्याचे सांगण्यात आले. नागपूर पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण 20.29 टक्के आहे. 488 नमुन्यांपैकी 99 पाण्याचे नमुने दूषित आढळले.
पूर्व विदर्भात गॅस्ट्रोचे चार हजार रुग्ण
- Details
- Hits: 3716
0