सकाळ वृत्तसेवा
१७ जून २०१०
नवी दिल्ली, भारत
ग्रामीण जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी देशातील 235 जिल्ह्यांमध्ये उपआरोग्य केंद्रांमधून 53 हजार 500 पुरुष आरोग्यसेवकांच्या भरतीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन' माफक दरात उपलब्ध करून देण्याची योजनाही मंजूर करण्यात आली आहे.
भरती केलेले आरोग्यसेवक उपआरोग्य केंद्रांमध्ये दिवस रात्र उपलब्ध असावेत, अशी आखणी केली जाणार आहे. रात्रीच्या वेळी प्राथमिक उपचारांसाठी आणि मदतीसाठी ते उपलब्ध असतील. मलेरिया, क्षय, कुष्ठरोग आदी रोगांबाबत ग्रामीण जनतेला माहिती देणे, तसेच रोग्यांना प्राथमिक उपचारासाठी मदत करण्याचे काम ते करू शकतील. त्याचबरोबर गावांमधील पाण्याचे नमुने घेणे, पाण्यात क्लोरिन टाकणे, ग्राम स्वच्छता आणि शाळांमधील मुलांच्या आरोग्याची पाहणीही त्यांना करावी लागणार आहे.
या योजनेसाठी प्रत्येक वर्षी 385 कोटी 52 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यापैकी पहिल्या वर्षी 85 टक्के, दुसऱ्या वर्षी 75 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 65 टक्के रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाईल. उर्वरित रक्कम राज्य सरकारांना द्यावी लागणार आहे. साथीच्या विविध आजारांची माहिती या आरोग्यसेवकांना व्हावी, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत त्यांना 500 रुपये प्रशिक्षण भत्ता दिला जाणार आहे.
मुलींना मिळणार सॅनिटरी नॅपकिन'
मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेविषयी जागृतता वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील मुलींना माफक दरात चांगल्या दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन' दिले जाणार आहे. 19 वयोगटापर्यंतच्या मुलींसाठी ही योजना असेल. दारिद्य्ररेषेखालील मुलींना एक रुपयात सहा सॅनिटरी नॅपकिन'चे एक पाकीट मिळेल, तर दारिद्य्ररेषेवरील मुलींना ते पाच रुपयांना मिळणार आहे. यासाठी सरकारने 150 कोटी रुपयांची योजना आखली असून, पहिल्या टप्प्यात देशभरातील 25 टक्के ग्रामीण भागात ही योजना राबविली जाईल. ज्यात 150 जिल्ह्यांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्राचीही निवड करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दहा ते 19 वयोगटातील दीड कोटी मुलींना होणार असल्याचा अंदाज आहे. ग्रामीण आरोग्यसेविकांमार्फत याविषयीची माहिती गावागावांमध्ये दिली जाईल. सॅनिटरी नॅपकिन' उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपविली जाईल. एक पाकिटामागे एक रुपया आरोग्यसेविकांना देण्यात येणार आहे.