सकाळ वृत्तसेवा
१३ मे २०१०
पुणे, भारत
लोकाधारित देखरेख प्रकल्पामुळे (सीबीएम) आरोग्य सेवांमध्ये आमूलाग्र सुधारणा झाल्या आहेत. हा प्रकल्प राबविण्यात आलेल्या राज्यातील पाच जिल्ह्यांपैकी सर्वाधिक सुधारणा पुणे जिल्ह्यात झाल्या आहेत, अशी माहिती साथी सेहत' स्वयंसेवी संस्थेचे समन्वयक डॉ. अभय शुक्ल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना'अंतर्गत (एनआरएचएम)सीबीएम हा प्रकल्प राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला. त्यात पुणे, ठाणे, नंदुरबार, अमरावती आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होता. याच्या यशस्वितेनंतर या प्रकल्पाचा विस्तार आणखी आठ जिल्ह्यांत करण्यात आला आहे.सीबीएम'मुळे पाच जिल्ह्यांतील आरोग्य सेवांची स्थिती सुधारणा घडल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. शुक्ल म्हणाले, गेल्या दीड वर्षांत तीन टप्प्यांमध्ये पाच जिल्ह्यांतील आरोग्य सेवांची माहिती गोळा करण्यात आली. त्यात साथीच्या रोगांचे नियंत्रण, मातामृत्यू, बालमृत्यू, गाव पातळीवरील उपचारात्मक सेवा, प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतर मिळणाऱ्या सेवा, लशीकरण अशा दहा निकषांच्या आधारे आरोग्य सेवांचे मूल्यमापन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात या पाच जिल्ह्यांमधील 48 टक्के आरोग्य सेवांची स्थिती चांगली होती. सीबीएम'मुळे दुसऱ्या टप्प्यात हे प्रमाण 61 टक्के झाले, तर तिसऱ्या टप्प्यात 66 टक्के आरोग्य सुविधा चांगल्या झाल्या.
यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे, असेही डॉ. शुक्ल यांनी सांगितले. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात पुणे जिल्हा 49 टक्क्यांवर होता. दुसऱ्या टप्प्यात त्याने 81 टक्के सुधारणा केली, तर तिसऱ्या टप्प्यात 85 टक्के आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्येही तिन्ही पातळ्यांवर सुधारणा झाल्याचे विश्लेषणातून पुढे आले आहे.
अशी केली पाहणी पाच जिल्ह्यांतील तीन तालुक्यांमधील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरातील पाच गावांमध्ये विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तेथील आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. लोकाधारित प्रकल्प सुरू होताना आरोग्याची स्थिती काय होती आणि त्यानंतर त्यात काय बदल झाले याची माहिती संकलित करण्यात आली. त्याचे विश्लेषण करून लोकाधारित प्रकल्पामुळे आरोग्याच्या हक्काबाबत नागरिकांमध्ये जागृती होत आहे. त्यामुळे तेथील सरकारी आरोग्य सुविधांची स्थिती सुधारत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे, असे डॉ. शुक्ल यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील आरोग्य सेवेत सुधारणा
- Details
- Hits: 3808
0