सकाळ वृत्तसेवा
०९ जुन २०१०
नाशिक, भारत
पावसाळ्याच्या तोंडावर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह सर्व ग्रामीण रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा साठा व स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. शिंगे यांनी दिले आहेत.
दर वर्षी पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जुलाब व उलट्या यांचे रुग्ण वाढतात. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने आजार होतात. या काळात शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे म्हणून आज डॉ. शिंगे यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या. अतिवृष्टीच्या काळात कोणीही मुख्यालय सोडून जाऊ नये, असे त्यांनी सांगितले. वीज अंगावर पडणे, जुलाब व उलट्या होणे असे रुग्ण या काळात वाढतात. म्हणून आवश्यक तो उपचारांचा साठा करून ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
वर्षाला 600 जणांना सर्पदंश
जिल्ह्यात दरमहा 50 जणांना सर्पदंश होत असून, आता बऱ्यौकी प्रबोधन झाल्याने सर्पदंश होताच शासकीय रुग्णालयात आणले जात असल्याने सर्पदंशाने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यापासून पावसाळा संपेपर्यंत सर्पदंशाचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत असते. जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 600 रुग्ण हे केवळ सर्पदंश झाला म्हणून दाखल होत असतात. पूर्वी सर्पदंश झाला की देवळात व मांत्रिकाकडे नेले जात असे. त्यातून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे होते. त्याविरुद्ध सातत्याने आरोग्य विभागाने प्रबोधन केले. त्यामुळे आता सर्पदंश झाल्यास ग्रामीण रुग्णालय, खासगी रुग्णालयात तातडीने नेले जाते. तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले जाते. वर्षभर एएसव्ही (ऍन्टी स्नेक व्हॅक्सीन) लस उपलब्ध असते. त्यामुळे सर्पदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अतिशय गंभीर परिस्थितीत रुग्ण आला असेल तरच मृत्यू होतो. शक्यतो रुग्ण बरे होऊनच जात आहेत.
पावसाळ्यासाठी होणार जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष
- Details
- Hits: 3186
0