सकाळ वृत्तसेवा
२१ सप्टेंबर २०१०
मुंबई, भारत
महापालिका मुख्यालय, रुग्णालये व पालिकेच्या विभागनिहाय कार्यालयांना असणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन 500 सुरक्षारक्षक खासगी एजन्सीमार्फत भरणार आहे. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळेही रुग्णालयांना सुरक्षाव्यवस्थेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात महापालिका मुख्यालयही दहशतवाद्यांचे लक्ष्य होते. त्यामुळे उच्च न्यायालयानेही पालिकेला आपली सुरक्षाव्यवस्था भक्कम करण्याचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवात दहशतवादी पुन्हा मुंबईत घुसल्याचा इशारा गुप्तचरांनी दिल्यामुळे पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
गेल्या 5 वर्षांत पालिकेने सुरक्षारक्षकांची भरती न केल्याने सुमारे 500 जागा रिक्त असून त्या एक ऑक्टोबरपासून भरल्या जाणार आहेत. यामध्ये 300 पुरुष व 200 महिला सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. "क्रिस्टल' या खासगी एजन्सीला सुरवातीला एक वर्षांसाठी हे काम देण्यात येणार आहे. त्यांचे काम समाधानकारक वाटल्यास मुदतवाढ देण्यात येईल. यासाठी आठ कोटी 61 लाख रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.
रुग्णालयांना प्राधान्य
केईएम रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यामुळे "मार्ड'ने संप केला होता. सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याची मागणी संघटनेने केली होती. त्या वेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात येत असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
पालिकेत खासगी एजन्सीचे 500 सुरक्षारक्षक भरणार
- Details
- Hits: 3149
0