सकाळ वृत्तसेवा
२९ एप्रिल २०१०
पुणे, भारत
केवळ नातेवाईक तक्रार करतात म्हणून नियम धाब्यावर बसवून एका युवकास थेट मनोरुग्णालयात दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना येरवडा मनोरुग्णालयात घडली आहे. असे करण्यासाठी केवळ पाच हजार रुपये खर्च आल्याची चर्चा असून पुढील काळामध्ये ही पद्धत रूढ होण्याची भीती या मनोरुग्णालयातील काही ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
येरवडा येथे राज्यातील मोठे मनोरुग्णालय आहे. बरे न होऊ शकणाऱ्या मनोरुग्णांना तेथे ठेवूनही घेतले जाते; पण तेथे रुग्ण दाखल करण्यासाठी पद्धत निश्चित करण्यात आली आहे. वेड्यासारखा वागतो म्हणून थेट या मनोरुग्णालयात दाखल करण्याची पद्धत अजून तरी येथे रूढ नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला येथे थेट दाखल करून घेण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील वीस वर्षांचा एक मुलगा वेड्यासारखा वागत असल्याची शंका आल्याने त्याच्या नातेवाइकांनी त्याला येरवड्यातील मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले. रुग्णालयात दाखल करण्यासाठी सर्वसाधारणपणे प्रथम बाह्य उपचार विभागात दाखल व्हावे लागते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून रुग्णाची माहिती घेतली जाते. मानसोपचारतज्ज्ञ त्याला तपासतात. वैद्यकीय अधीक्षकांसमोर आणले जाते. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येते. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला रुग्णालयात दाखल करता येते.
अगदी अपवादात्मक बाबींमध्ये रुग्णाला स्वतःला वाटल्यास रुग्णालयात दाखल होता येते. मात्र, त्यासाठी संबंधित रुग्ण या पूर्वी अशा पद्धतीने उपचार घेत असल्याची खात्री पटवून द्यावी लागते. या रुग्णालयांची स्थिती पाहिल्यावर बाहेर पडलेला कोणताही मनोरुग्ण पुन्हा या दिशेने येण्यासही घाबरतो. त्यामुळे हा पर्याय क्वचितच वापरला जातो. या युवकाला याच प्रकारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या अर्जावर त्या रुग्णाची स्वाक्षरी घेण्याऐवजी त्याच्या नातेवाईकांची स्वाक्षरी घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे हा रुग्ण या पूर्वी मनोविकारांसाठी उपचार घेत होता किंवा नाही याची खातरजमाही करण्यात आलेली नाही.
या बाबत येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर यादव म्हणाले, रुग्णालयात दाखल करण्यासाठी आलेल्या रुग्णाला दाखल करून घेण्याची पद्धत निश्चित करण्यात आलेली आहे; पण या प्रकरणांमध्ये रुग्णाला थेट दाखल करण्यात आले आहे. त्यासाठी स्वेच्छेने रुग्णांना दाखल करून घेण्याचा अधिकार अधीक्षकांना आहे. त्यानुसार हा रुग्ण येथे आहे.'
आरोग्य खात्याच्या सहसंचालक डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या, मनोरुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज असते. रुग्णाला मानसिक आजार असल्याची माहिती असल्याने तो रुग्ण स्वेच्छेने रुग्णालयात दाखल होतो, ही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची दुसरी पद्धत आहे. यात रुग्ण स्वतः अर्जावर स्वाक्षरी करतो. रुग्ण त्या स्थितीत नसल्यास त्याचे नातेवाईक अर्जावर स्वाक्षरी करतात. या प्रकरणाबाबत चौकशी करण्यात येईल.
या बाबत डॉ. अलका पवार (संचालक, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था) म्हणाल्या, रुग्ण इतरांप्रमाणे सामान्य आहे, याचा अर्थ तो मानसिकदृष्ट्या ठीक आहे, असा होत नाही. मानसिक आजारांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे संबंधीत रुग्णाची तपासणी करूनच त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. महाराष्ट्रात एखाद्याला मानसिक आजारी ठरवून त्याला मानसोपचार रुग्णालयात दाखल करण्याच्या घटना सामान्यपणे घडत नाहीत.
हे काहीही असले तरीही या रुग्णाचे नातेवाईक मात्र वेगळीच माहिती देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार हा रुग्ण स्वतः स्वाक्षरी करण्याच्या मनस्थितीत होता. ते म्हणाले, तो रुग्ण दहावी नापास झाल्याने तो कधीकधी वेड्यासारखा वागतो. त्यामुळे त्याला दाखल करण्यासाठी येथे आणले. त्याला दाखल करण्यासाठी पाच हजार रुपये लागत असल्याची माहिती येथील एका मध्यस्थाने दिली. त्याप्रमाणे पाच हजार रुपये भरून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डांबण्याचा नवा मार्ग?
येरवडा मनोरुग्णालयातील प्रकार सकाळ'ला कळविणारे या रुग्णालयातील काही डॉक्टर मात्र वेगळ्याच काळजीत आहेत. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ते म्हणाले, ही घटना वेगळ्या पद्धतीने बघितली गेली पाहिजे. अशा प्रकारे काही मोजके पैसे देऊन कोणालाही मनोरुग्णालयात डांबून ठेवण्याचा मार्ग या निमित्ताने खुला होत नाही ना? याची तपासणी व्हायला हवी. त्याचप्रमाणे आधीच या मनोरुग्णालयात नियमापेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञही अपेक्षित संख्येने नाहीत. अशा पद्धतीने रुग्ण दाखल झाल्यास त्याचा परिणाम सर्व प्रशासकीय व्यवस्थांवर होणार आहे. त्यामुळे हा प्रकार अधिक धक्कादायक वाटतो आहे.
पाच हजार रुपयांत ठरविले मनोरुग्ण!
- Details
- Hits: 3580
0