Print
Hits: 3152

सकाळ वृत्तसेवा
१० जुन २०१०

मृत्यूनंतरही जिवंत राहू शकणारा व इतरांना प्रकाश देणारा अवयव म्हणजे नेत्र. नेत्रदानाविषयी समाजात असणारी उदासीन वृत्ती पाहता, प्रबोधनाद्वारे जनमानसाचे डोळे उघडण्याची गरज आहे. आजच्या जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्‍यक आहे.

एखादी व्यक्ती जिवंतपणे इतरांना उपयुक्त ठरणे आपण समजू शकतो; परंतु अवयवरोपणाद्वारे मृत्यूनंतरदेखील आपण कोणाच्या तरी कामी येऊन त्यांना जीवनदान देऊ शकतो, ही कल्पना वैद्यक क्षेत्रातील अफाट संशोधनाने प्रत्यक्षात आणली आहे. नेत्रदानाद्वारे गरजूंना मिळणारी नवदृष्टी ही विज्ञान व वैद्यक तज्ज्ञांनी जगाला दिलेली मोठी देणगी आहे. नेत्रदानाच्या आवाहनाविषयी सातत्याने ऐकावयास मिळते; परंतु व्यावहारिक पातळीवर हे आवाहन प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालय, प्रवरा मेडिकल ट्रस्ट व साईसूर्य नेत्रसेवा या तीन ठिकाणी नेत्रपेढ्या असून, तेथेच नेत्ररोपणाची सुविधा आहे. भारतात दरवर्षी वीस ते पंचवीस लाख लोकांना नेत्ररोपणाची गरज असते. तथापि, फक्त ३० ते ३५ हजारच नेत्ररोपण होते. हे चित्र विचारात घेता, नेत्रदानाची गरज प्रकर्षाने पुढे येते. एखाद्या व्यक्तीची नेत्रदानाची खरोखर इच्छा असली, तरी त्याची अंमलबजावणी तो स्वतः करू शकत नाही. त्याचे कुटुंबीय व आप्तेष्टांनीच ही इच्छापूर्ती प्रत्यक्षात आणायची असते. दुर्दैवाने अशी व्यक्ती जग सोडून जाते, तेव्हा कुटुंबीयांना बसलेला धक्का असह्य असतो. शोकमग्न वातावरणात नेत्रदानाचे सोपस्कार पार पाडणे मोठे दिव्य असते. नेत्रदानाची इच्छा व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाबाबत ते कृतीतून शक्‍य होतेच असे नाही. खरे तर याबाबत निकटवर्तीयांवर फार मोठी जबाबदारी आहे. आपल्या आप्तेष्टाच्या नेत्राद्वारे एखाद्या दृष्टिहिनाच्या आयुष्यात "दिव्य प्रकाश' निर्माण होऊ शकतो, या भूमिकेतून कुटुंबीयांनी पुण्यकर्म समजून पुढील सोपस्कार करायला हवेत.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढवल्यास काही तासांच्या आत नेत्रदान व त्यानंतर नेत्ररोपण शस्त्रक्रिया करावी लागते. त्यादृष्टीने सर्वच हालचाली वेगाने घडल्या, तरच अपेक्षित परिणाम साधला जाऊ शकतो. समाजाच्या विविध थरांत जाऊन कानोसा घेतला असता, नेत्रदानाविषयी समाजमनाची कवाडे अद्याप पूर्णपणे उघडलेली नाहीत. ही डोळेझाक वृत्ती बदलण्यासाठी सामाजिक संस्था व प्रभावशाली घटकांकडून प्रबोधनाची गरज आहे, याची प्रचिती आली.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त सोनईच्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाने दहा हजार नेत्रदानाचा संकल्प संमतिपत्राद्वारे उभा केला. नेत्रदानाविषयी असणारी अनास्था पाहता, यशवंत प्रतिष्ठानचा हा उपक्रम आश्‍वासक पाऊल ठरावा. समाजमनाचे द्वार किलकिले झाले तरी ते उघडण्याची आशा धरायला हरकत नाही. वरील संस्थेने यासंबंधी केलेली लोकजागृती इतरांना अनुकरणीय ठरावी, अशी आहे. केवळ समारंभप्रियता म्हणून असे संकल्प कार्यक्रम होणार नाहीत, याची खबरदारी यशवंत प्रतिष्ठानाने घेतल्याचे दिसून येते आहे; कारण असा संकल्प केल्यानंतर काही दिवसांतच सोनईच्या पुष्पा संतराम राऊत जग सोडून गेल्या. त्यांच्या मुलाने आईची इच्छापूर्ती म्हणून नेत्रदानासंबंधी सर्व सोपस्कार पूर्ण करवूनच उत्तरक्रिया केली. नेत्रदानाचा संकल्प अमलात आणण्यासाठी उपरोक्त प्रतिष्ठानाने संबंधितांना कार्डे दिली आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांची संघटित फळी आहे. विनाविलंब सर्व घडामोडी पूर्ण करण्याकडे या कार्यकर्त्यांचा कल असतो. या सर्व तयारीचा विचार केला, तर नेत्रदानाच्या घाऊक संधी याद्वारे निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍यात प्रभावशाली असणाऱ्या नेतेमंडळींनी आपल्या भागात त्यांच्या संस्थांमार्फत अशी चळवळ राबविली, तर ती संपूर्ण देशाला आदर्शवत ठरेल. सहकाराचे बीजारोपण ज्या नगर जिल्ह्याने यशस्वी करून दाखविले, त्या जिल्ह्यात नेत्ररोपणाद्वारे दृष्टिदानाची चळवळ अंधारयुगातल्यांना प्रकाशाच्या वाटेवर नेईल. नेत्रदानाविषयी माहिती घेतली असता, जैन समाजात याविषयी इतरांपेक्षा अधिक जागृती पाहायला मिळते.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.