सकाळ वृत्तसेवा
२७ एप्रिल २०१०
नाशिक, भारत
शहरात गेल्या काही महिन्यांत डासांनी उच्छाद मांडला असून, चार महिन्यांत हिवतापाच्या 25 रुग्णांची नोंद महापालिकेत झाली आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर आरोग्य विभागामार्फत प्रमुख नद्यांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सेफ्टी टॅंकमुळेदेखील डासांची उत्पत्तीस्थाने वाढत असून, त्याच पार्श्वभूमीवर घर किंवा सोसायट्यांमधील सांडपाणी थेट मलवाहिकांना जोडण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे.
शहरात डासांच्या प्रमाणात वाढ होत असून, सायंकाळनंतर नागरिकांना घरात बसणे कठीण झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डास निर्मूलन मोहिमेंतर्गत जेथे पाणी साचते तेथे औषध फवारणी करण्यात येते, असा दावा केला जातो. त्यासाठी वृत्तपत्रांत औषध फवारणीचा कार्यक्रमदेखील घोषित केला जातो. परंतु हा प्रकार फसवा असून, डास निर्मूलन मोहीम व्यवस्थितपणे राबविली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गेल्या काही महिन्यांत मात्र शहरात डासांची उत्पत्ती झपाट्याने झाल्याने नागरिकांना होणारा त्रास वाढला आहे. त्यामुळे हिवतापाचे रुग्ण वाढले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्यांव्यतिरिक्त अधिक रुग्ण शहरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापालिकेत मात्र जानेवारी महिन्यात दोन, फेब्रुवारीत 12, मार्च सात आणि एप्रिल महिन्यात चार याप्रमाणे 25 रुग्ण आढळल्याचे आरोग्याधिकारी डॉ. कोंडिराम पवार यांनी सांगितले. महापालिकेने नुकतीच गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरवात केली असून, नासर्डी नदीदेखील स्वच्छ करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत नदीपात्रात पुरेसे पाणी नसल्याने साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
सेफ्टी टॅंक बंद करणार
शहरात डास वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे शहरातील सदोष सेफ्टी टॅंक आहेत. किरकोळच्या छिद्रातून डास आतमध्ये जाऊ शकतात अथवा निर्मितीनंतर होऊ शकतात. परंतु सिमेंटचे बंदिस्त सेफ्टी टॅंक आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासता येत नाहीत आणि त्यात औषधदेखील फवारता येत नाही. त्यामुळे सेफ्टी टॅंक बंद करावेत आणि घरांमधील सांडपाणी तसेच शौचालयाच्या मलवाहिका थेट भुयारी गटार योजनेस जोडाव्यात, अशी आरोग्याधिकाऱ्यांची सूचना आहे. आयुक्तांनीदेखील ते मान्य केली असून, प्रायोगिक तत्त्वावर अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे खातेप्रमुखांच्या बैठकीत स्पष्ट केले.
डास मोजणीची पद्धतच सदोष
शहरात डासांचा प्रचंड त्रास असताना महापालिकेच्या लेखी मात्र डासांची घनता नेहमीप्रमाणे मर्यादेतच आहे. त्याचे मूळ कारण म्हणजे डासांची घनता मोजण्याची वेळ सकाळी सहा ते सात आणि सायंकाळी सहा ते सात अशी आहे. परंतु महापालिकेतर्फे सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान घनता मोजण्यात येते. सकाळी सहाला कोणत्याही भागातील नागरिक कर्मचाऱ्यांना डास पाहणीसाठी येऊ देणार नाहीत, असे या संदर्भात सांगण्यात येते. त्यामुळे आरोग्याधिकारी डॉ. पवार यांनी सायंकाळी डासांची घनता मोजण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिकमध्ये हिवतापाचे चार महिन्यांत २५ रुग्ण
- Details
- Hits: 3311
0