सकाळ
२५ मे २०१०
नागपूर, भारत
महापालिकेच्या फिरत्या रुग्णालयातून रुग्णांना मुदतबाह्य औषधांचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक बाब आज उघडकीस आली. महापौर अर्चना डेहनकर यांनी महापालिकेचे फिरते रुग्णालय आणि रुग्णवाहिकेची अचानक तपासणी केली. यात अनेक गैरयोसी आढळल्याने आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश त्यांनी दिले.
महापालिकेच्या रुग्णवाहिकेत सिलिंडर, प्रथमोपचारपेटी उपलब्ध नव्हती. रुग्णवाहिकेची स्थितीसुद्धा चांगली नव्हती. यातील स्ट्रेचर तुटलेले होते, ते दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. याशिवाय यात उपलब्ध औषधसाठ्यांची मुदत संपलेली होती. हा धक्कादायक प्रकार बघून महापौरांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी तत्काळ संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. रुग्णावाहिका अतिशय खराब झालेली असताना ती आजवर दुरुस्त का करण्यात आली नाही, याचेही स्पष्टीकरण त्यांनी मागितले.
महापालिकेची रुग्णवाहिका आणि फिरत्या रुग्णालयात सुविधा नसल्याची माहिती महापौरांना देण्यात आली होती. सत्यता तपासण्यासाठी दोन्ही गाड्या त्यांनी महापालिकेच्या सिव्हिल लाइन कार्यालयात बोलावून घेतल्या होत्या. फिरत्या रुग्णालयातील डॉक्टर श्रीमती गौर यांनीसुद्धा औषधांची मुदत संपलेली असल्याचे मान्य केले. मात्र, याची माहिती आम्हाला होती. ही औषधे रुग्णांना वाटण्यात येऊ नयेत याकरिता वेगळी काढून ठेवण्यात आलेली होती, असे त्यांनी महापौरांना सांगितले.
टीप' देणारा कर्मचारी कोण?
आरोग्य विभागाकडून हकालपट्टी झालेल्या एका कर्मचाऱ्याने महापौरांना याची माहिती दिली होती. हा कर्मचारी पूर्वी आरोग्य विभागात स्टोअरकीपर म्हणून कार्यरत होता. मात्र, त्याचे अनेक घोटाळे उघडकीस आल्याने त्याच्याकडून स्टोअरकीपरची जबाबदारी काढून टाकण्यात आली होती. सध्या पाचपावली रुग्णालयात तो कार्यरत असून महापौरांचा सहायक म्हणून तो सिव्हिल कार्यालयातच वावरत असतो. तो कोण, याची चर्चा पालिकावर्तुळात आज होती.
नागपूर पालिकेच्या फिरत्या रुग्णालयात मुदतबाह्य औषधसाठा
- Details
- Hits: 3024
0