सकाळ वृत्तसेवा
१९ मे २०१०
अमरावती, भारत
सहा दिवस व रात्र नॉनस्टॉप गाणी म्हणून विक्रमाची नोंद करणाऱ्या विराग वानखडे या अमरावतीच्या युवकाने त्याचा क्लब स्थापन करून 24 तासांचा गाण्याचा विक्रमदेखील केला होता. आता त्यांनी दोन लाख नागरिक जोपर्यंत नेत्रदान करीत नाहीत, तोपर्यंत पाण्याच्या खाली राहून गाण्याचा विक्रम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
रोशनी जिंदगी में, असे या उपक्रमाचे नाव असून अंडर वॉटर म्युझिकल थ्रिलर आणि दोन लाख नेत्रदानाचं मिशन येत्या ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात आले आहे. यापूर्वी आठ तासांत 241 नेत्रदान करण्याचा विश्वविक्रम इंग्लंडच्या नावावर आहे; पण दोन लाख नेत्रदानाचा हा विक्रम जगात पहिल्या क्रमांकावर राहणार आहे. त्यासाठी मुंबईपासून नव्या अभियानाला सुरवात करण्यात आली असून, 250 महाविद्यालये तसेच 180 डोळ्यांच्या रुग्णालयात प्रबोधन, कार्यशाळेला सुरवात झाली आहे. विदर्भाच्या विविध महाविद्यालयांतदेखील हा उपक्रम हाती घेण्यात येत असून, युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी एक वेबसाइटसुद्धा येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. त्यावर नागरिक नेत्रदानाचा संकल्पदेखील करू शकतात, असे विराग वानखडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड असोसिएशन, महाराष्ट्र होमिओ डॉक्टर्स असोसिएशन, ऑप्थोल्मिक असोसिएशन, आय बॅंक को-ऑर्डिनेशन्स ऍण्ड रिसर्च सेंटर, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक अशा विविध संघटनांच्या माध्यमाने हा उपक्रम साकारत आहे.
अंडर वॉटर म्युझिकल थ्रिलरमध्ये विराग वानखडे सात फूट लांब, सात फूट रुंद आणि नऊ फूट उंच आकाराच्या पाण्याने पूर्ण भरलेल्या काचेच्या केबीनमध्ये उतरून हेडसेटच्या मदतीने गाणी गाणार आहे. ही नॉनस्टॉप गाणी हिंदी, मराठी, पंजाबी, इंग्रजी भाषांमधील असतील. विराग गाणी गात असतानाच त्यावर विविध ठिकाणांहून आलेले कलाकार नृत्यही करतील.
दोन लाख नेत्रदानाची धडपड!
- Details
- Hits: 2925
0