सकाळ वृत्तसेवा
१७ सप्टेंबर २०१०
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत
आपल्यामधील अनेकांच्या शारीरप्रेरणा भिन्न असतात, वरकरणी सारं आलबेल असलं तरीही शरीरात होणारे बदल, मनातील स्थित्यंतरं, लैंगिक प्रेरणा या चारचौघांसारख्या नसल्यामुळे त्याबद्दल खुलेपणाने या व्यक्तींना कुणाशीही बोलता येत नाही. तनामनामध्ये सुरू असणारं हे द्वंद्व केवळ समाज काय म्हणेल या भीतीपोटी दडपून टाकलं जातं, त्यातून पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात. दिवसेंदिवस अशा व्यक्तींची संख्या वाढती आहे, हे लक्षात घेऊन मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातील शरीरशास्त्र संशोधन विभागाने अशा व्यक्तींमधील जनुकीय बदलांवर विशेष संशोधन सुरू केलं आहे. दोन वर्षं सुरू असणाऱ्या या संशोधनकार्यामध्ये शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गंगाणे, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. शबाना बोराटे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.
जे. जे. रुग्णालयामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी अनेक रुग्ण येत असतात. त्यामध्ये वंध्यत्वाच्या, लैंगिक समस्यांविषयी उपचार करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी असते. तपासणीअंती जनुकीय बदलांचे महत्त्वपूर्ण कारण पुढे येते. यातील काही जणांच्या लैंगिक प्रेरणा वेगळ्या असतात. मात्र त्याबद्दल कुठेही वाच्यता न करता चारचौघांसारखं लग्न केलं जातं. अनेकदा हा काही आजार आहे असा दृढ समज मनाशी बाळगून उपचार करण्यासाठी काही रुग्ण येतात. यातून बरं होण्यासाठी अघोरी पद्धतीच्या उपायांचाही सर्रास वापर केला जातो, हे सारं बदलतं चित्र पाहून याविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची निकड शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गंगाणे व्यक्त करतात. या व्यक्तीमधील जनुकीय बदलांचा अभ्यास केल्यानंतर त्यातून शरीरशास्त्राविषयी, गुणसूत्रांचे नियमन, वंध्यत्व, लैंगिकता यासारख्या अनेक बाबींवर प्रकाश टाकता येईल, मात्र त्यासाठी अशा व्यक्तींचं मोलाचं सहकार्यही गरजेचं असल्याचं डॉ. प्रसाद कुलकर्णी स्पष्ट करतात. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर काही जणांना आपलं हे वेगळेपण कळतं व ते स्वीकारताही येतं. मात्र वयात येण्यापूर्वी अन् येताना हे दोन्ही महत्त्वाचे टप्पे असतात. अनेक सुशिक्षित घरांतील मुलांना दडपून ठेवणारे पालकही आपल्या भोवताली असतात, त्यामूळे सुदृढ, निरोगी पिढीच्या भविष्यासाठी हे संशोधनकार्य मोलाचं योगदान देणार आहे.
यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या शरीरशास्त्र विभागामध्ये कोणत्याही वयाच्या व्यक्ती आपले रक्तनमुने तपासणीसाठी देऊ शकतात, याचा दुहेरी उपयोग करून त्यान्वये रुग्णांना मार्गदर्शन व संशोधनासाठी वापर करण्यात येणार आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये या पद्धतीचं संशोधन सुरू असलं तरी आपल्याकडील हा पहिला महत्त्वपूर्ण प्रयत्न असणार आहे.