सकाळ वृत्तसेवा
१४ जुन २०१०
पुणे, भारत
कोणत्याही आजाराला सामोरे जाताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अर्धी लढाई जिंकल्यासारखीच असते. आजकाल मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रोगाची केवळ कारणमीमांसा करण्यापेक्षा तो आजार होऊ नये म्हणून आणि झालाच तरी खचून न जाता त्यास धैर्याने सामोरे जाण्यास मनाची ताकद महत्त्वपूर्ण असते, असे प्रतिपादन डॉ. जब्बार पटेल यांनी केले.
"दीनानाथ मंगेशकर रुग्णालया'तर्फे मधुमेहविषयक "शुगर फ्री- कथा एका मधुमेहीची' व "इट्स टाईम फॉर माय इन्शुलीन' या दोन लघुपटांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ""महागड्या वैद्यकीय खर्चाला रुग्णाला सामोरे जावे लागू नये म्हणून खुद्द डॉक्टरच लघुपटाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. रुग्ण व डॉक्टर दरम्यान भावनिक दरी निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर "फॅमिली डॉक्टर'ची संकल्पना कालबाह्य झाली नसून असे वेगळे प्रयत्न करणारे डॉक्टर हे घरातल्या माणसाचीच भूमिका निभावत आहेत आणि हे निश्चितच कौतुकास्पद प्रयत्न आहे,'' असेही पटेल म्हणाले.
रुग्णालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजीव मंगरूळकर लघुपट निर्मितीविषयी बोलताना म्हणाले, ""माध्यमाची ताकद ओळखून व गेली पंचवीस वर्षे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन समाजामध्ये मधुमेहाविषयी जागृती करण्याच्या विचाराने हे दोन लघुपट निर्माण केले आहेत.''
डॉ. श्रीराम लागू म्हणाले, ""वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत असताना निव्वळ व्यावसायिकता न मानता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मंगेशकर रुग्णालयातर्फे निर्माण झालेले हे लघुपट आदर्शच ठरतील.''
या वेळी डॉ. धनंजय केळकर म्हणाले की आजारी पडल्यानंतरची रुग्णाची मानसिकता, डॉक्टर व रुग्ण यांच्यातील विश्वास, आपल्याला झालेल्या रोगाविषयी शास्त्रशुद्ध माहिती या सर्व गोष्टी रुग्ण बरा होण्यास कारणीभूत ठरतात. अज्ञानात सुख असते, अशी मानसिकता न ठेवता रुग्णांनीही जागरूक राहायला हवे. या दोन लघुपटांची निर्मिती ही डॉक्टर व रुग्ण यांच्या वृत्तीतील फरकाची नांदीच म्हणावी लागेल.
लघुपटांचे दिग्दर्शक नंदू क्षीरसागर म्हणाले, ""हे दोन्ही लघुपट मनोरंजनाबरोबरच शास्त्रशुद्ध माहिती देणारे आहेत. रुग्णांशी संवाद साधण्यातील सगळे अडथळे पार करण्याचा प्रयत्न आम्ही केला. लोकसंवाद साधण्यासाठी दृक्श्राव्य माध्यम प्रभावी ठरते हे निर्विवाद सत्य आहे.''
प्रकाशन समारंभात डॉ. केळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. डॉ. पुष्कर खैर यांनी निवेदन केले. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.