सकाळ वृत्तसेवा
०४ सप्टेंबर २०१०
पुणे, भारत
इटली येथील प्रख्यात आंतरराष्ट्रीय हृदय शल्यचिकित्सक डॉ. कार्लास व्हिन्सेंटी यांनी ससून रुग्णालयात दाखल झालेल्या तीन गरीब रुग्णांवर शुक्रवारी मोफत शस्त्रक्रिया केली. रुग्णालयातील हृदयरोग विभागात बसविण्यात आलेल्या अद्ययावत वैद्यकीय उपकरणांमुळे आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सकांचे ज्ञान सामान्य रुग्णांनाही उपयुक्त ठरत आहे.
ससून रुग्णालयाच्या हृदयरोग विभागात "संधिवातजन्य हृदयाच्या झडपांची दुरुस्ती' या विषयावर दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ससून रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश इनामदार, अहमदाबाद येथील हृदय शल्यचिकित्सक डॉ. प्रियंकर सिन्हा, डॉ. संजीवनी इनामदार, डॉ. अशोक कानिटकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत देशभरातून 25 हृदयरोगतज्ज्ञ सहभागी झाले आहेत.
याबद्दल अधिक माहिती देताना डॉ. इनामदार म्हणाले, 'संधिवातजन्य हृदयाच्या झडपांच्या आजाराचे जगातील सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. देशातील गरीब रुग्णांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. संधिवातामुळे झडपांना गळती निर्माण होते. हृदयातील "मायट्रल' आणि "ऍऑर्टिक' या झडपांची कार्यक्षमता कमी होते. हृदयातून पुढे जाणारे रक्त परत हृदयाकडे फिरू न देणे, हे या झडपांचे प्रमुख कार्य आहे. या झडपा कमकुवत झाल्याने रक्त परत हृदयाकडे फिरते. यावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. ही शस्त्रक्रिया डॉ. व्हिन्सेंटी यांनी येथील तीन गरीब रुग्णावर केली आहे.''
ते म्हणाले, 'या प्रकारच्या आजारांमध्ये रुग्णाच्या हृदयाची झडप बदलावी लागते. मात्र, त्याचेही काही दुष्परिणाम आहेत. ते टाळण्यासाठी संधिवातामुळे खराब झालेल्या झडपांची दुरुस्ती करणे, हा एक प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे रुग्णाला त्याचे नैसर्गिक जीवन चांगल्या प्रकारे जगता येते. कृत्रिम झडपांचे दुष्परिणाम यात दिसत नाहीत.''
तीन गरीब रुग्णांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया
- Details
- Hits: 3333
0