Print
Hits: 3138

सकाळ वृत्तसेवा
०९ जुन २०१०
मुंबई, भारत

पावसापूर्वीच मुंबईत यंदा तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. धावपळीच्या आयुष्यात केमिस्टकडून एखादी तापाची गोळी घेऊन वेळ मारून नेण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. मात्र यामुळे दुखणे अंगावर शेकू शकते, असा सावधगिरीचा इशारा देत "ताप अंगावर काढू नका, जवळच्या दवाखान्यात अथवा पालिका रुग्णालयात जा...' अशी सूचना करणारे फलक येत्या काही दिवसांतच केमिस्टच्या दुकानांतून तुम्हाला पाहायला मिळतील.

पावसाळ्यात दरवर्षी साथीचे आजार डोके वर काढतात. पावसाच्या चार महिन्यांत दोनशे ते तीनशे जणांचे बळी साथीचे आजार घेतात, अशी पालिकेचीच आकडेवारी आहे. मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या वर्षीपेक्षा यंदा मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. याबाबत पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आजार बळावल्यावरच रुग्ण रुग्णालयात धाव घेत असल्याचे दिसते. त्यामुळे मलेरियाचा धोका वाढण्यापूर्वीच उपाय करण्याची तत्परता पालिकेने दाखविली आहे.

पालिकेतर्फे मुंबईतील 24 प्रभागांत आरोग्य शिबिरे घेतली जाणार असून खासगी डॉक्‍टरांना मलेरियाच्या तापाची लक्षणे व उपचारांविषयी माहिती देणारी कार्यशाळा जूनच्या तिसऱ्या आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी दिली. डास चावल्यास मलेरियाचा ताप येईपर्यंत वीस दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे रुग्णाला आलेला ताप मलेरियाचा तर नाही ना, याचे वेळेतच निदान होण्याची गरज आहे. त्यासाठी केमिस्टच्या दुकानांत लवकरच "ताप अंगावर काढू नका, जवळच्या दवाखान्यात अथवा पालिका रुग्णालयात जा...' असा संदेश देणारे फलक लावण्यात येणार असल्याचे श्रीमती म्हैसकर यांनी सांगितले.

मुंबईतील साथीचे 1 जूनपासूनचे रुग्ण
आजार रुग्ण
ताप 1,137
गॅस्ट्रो 351
लेप्टो 1
डेंग्यू 3
मलेरिया 359
आठवडाभरात मलेरियाने दोघांचा मृत्यू

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.