सकाळ वृत्तसेवा
०९ जुन २०१०
संजयकुमार कांबळे
सांगवी, भारत
औंधमधील जिल्हा सामान्य व उरो रुग्णालयातील डॉक्टर बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांना प्राथमिक तपासणी न करताच केवळ सांगितलेल्या आजारावर औषधे देतात. सरकारी दवाखान्यातील या बेपर्वाईमुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे.
या रुग्णालयात सांगवी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, वाकड, श्रीनगर, गुरव पिंपळे, कस्पटे वस्ती, रहाटणी, औंध, काळेवाडी परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात. सकाळी दहा ते दुपारी दोन अशी बाह्यरुग्ण विभागाची वेळ आहे. या वेळात येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांची वाट पाहत तासन्तास बसावे लागते. डॉक्टर आल्यानंतर उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी आपला आजार सांगायचा आणि कसल्याही प्रकारची तपासणी न होता लिहून दिलेली औषधे घेऊन जायचे, हा एककलमी कार्यक्रम राजरोसपणे चालू आहे. मात्र, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या यादीप्रमाणे त्याच कंपनीचे औषध व गोळ्या औषधालयात उपलब्ध नसतात. या वेळी समकक्ष औषध घटक द्रव्ये वापरलेली दुसऱ्याच कंपनीची औषधे रुग्णांना दिली जातात.
औषध भांडारात चौकशी केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, भांडारात उपलब्ध नसलेली औषधे डॉक्टर रुग्णांना लिहून देतात. त्यामुळे दुसऱ्या कंपनीची औषधे व गोळ्या रुग्णांना देणे आम्हाला भाग पडते. रुग्णालयात येणारे बहुतांशी रुग्ण कमी शिकलेले असल्याने, दिलेली औषधे विश्वास ठेवून निमूटपणे घेऊन जातात. यादीतील गोळ्या व औषध कसे घ्यायचे, त्याची मात्रा किंवा नोंद डॉक्टर करीत नसल्याने औषधालयातून दिली जाणारी औषधे तेथील कर्मचारी सांगेल त्याप्रमाणे रुग्णांनी घ्यायची. या औषधांपासून कित्येक रुग्णांना त्रासही होतो. याबाबत संबंधित डॉक्टरांकडे तक्रार केल्यानंतर ती बदलून दिली जातात.
बाह्यरुग्ण विभागातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांना भेटण्यासाठी आलेल्या रुग्णांना तेथील कर्मचाऱ्यांनी दुपारी एक वाजताच "जेवणाची सुटी आहे', असे सांगून थांबवून ठेवले. जेवण झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांना भेटण्याची परवानगी दिली. जेवणाच्या वेळेबाबत चौकशी केली असता व्यवस्थित माहिती मिळू शकली नाही.
औषधालयाची वेळ सकाळी दहा ते पाचपर्यंत असतानाही बऱ्याचदा रुग्णांना किंवा त्यांच्या नातलगांना या वेळेतही तेथील कर्मचारी येईपर्यंत प्रतीक्षाच करावी लागते. मांडीचे हाड मोडल्यामुळे कुणाल लांडगे हा मुलगा उपचारासाठी रुग्णालयात आला होता. तपासणीनंतर त्याला दाखल करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, बाह्यरुग्ण विभागातून त्याला उचलून नेण्याकरिता एकही कर्मचारी तयार नसल्याने त्यास सुमारे दोन तास तेथेच पडून राहावे लागले, असे त्याच्या नातलग मंगल गायकवाड यांनी सांगितले. रुग्णालयाची लिफ्ट गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने, रुग्णांची ने-आण करण्याचे काम टाळण्याकडे कर्मचाऱ्यांचा कल दिसून येतो. या रुग्णालयातील रक्तपेढीत फक्त पंधरा बाटल्या रक्त संकलित करण्याची सोय आहे. त्यामुळे परिसरातील दात्यांना रक्तदानही करता येत नाही.
यासंदर्भात रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. एम. सी. नगरे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.