सकाळ वृत्तसेवा
०३ ऑगस्ट २०१०
मुंबई, भारत
साथीच्या आजारांनी त्रस्त झालेल्या गोरगरिबांना आता पालिकेच्या रुग्णालयांनी विविध तपासण्यांसाठी सुरू केलेल्या शुल्कवाढीमुळे दरदरून घाम फुटणार आहे. मलेरिया, डेंगी, लेप्टोसारख्या साथी धुमाकूळ घालत असताना या आजारांचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या तपासण्यांसाठी पालिका रुग्णालयांमध्ये शुल्कआकारणी करण्याचे घाटत आहे. अन्नाची दोनवेळ ददात असणाऱ्या गोरगरीब रुग्णांना दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा देणारी पालिका रुग्णालये देवदूतासारखी वाटतात; पण आता त्याच ठिकाणी साथीचा वाढता जोर पाहून उखळ पांढरे करण्याचा धंदा जोर धरतो की काय, अशी शंका रुग्णांप्रमाणेच येथे अनेक वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या आरोग्यसेवकांच्याही मनात येऊ लागली आहे.
न्यूक्लिअर मेडिसिन विभागामधील थायरॉईड, टीवन, टीथ्रीसारख्या तपासण्यांसाठी केईएम, नायर या रुग्णालयांतून दोनशे रुपये शुल्क घेण्यात येते. आता लोकमान्य टिळक रुग्णालयांमध्येही हे शुल्क घेण्यात यावे, असे निर्देश रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. संध्या कामत यांनी दिलेले आहेत. प्रत्येक बुधवारी ऐंशी ते दीडशे रुग्णांच्या मोफत तपासण्या या विभागामध्ये करण्यात येतात; मात्र यापुढील काळात या रक्ततपासण्यांसाठी दोनशे रुपये मोजावे लागणार आहेत. अनेकदा ज्या रुग्णांकडे केसपेपर बनवण्यासाठीही पाच रुपये नसतात, अशा रुग्ण या तपासण्यांसाठी शे रुपये कसे आणणार, असा प्रश्न असला तरीही ही दरवाढ नियमावलीनुसार असल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. संध्या कामत यांनी "सकाळ'ला सांगितले. यापुढील टप्प्यांत सीबीसी, युरिन, जी.ओ.पी., एम.पी. या तपासण्यासाठीही रुग्णांना दामदुप्पट रक्कम मोजावी लागणार असल्याचे कळते; मात्र केईएम, नायर रुग्णालयांमध्ये दहा वर्षांपासून केवळ थायरॉईडच्या तपासण्यांसाठी शुल्क आकारणी केली जाते. त्यानुसार लोकमान्य टिळक रुग्णालयांमध्ये केवळ त्याच विभागासाठी ही शुल्कआकारणी असून साथीच्या आजारांसाठी असणाऱ्या कोणत्याही तपासणीसाठी शुल्क आकारणी करण्यात येणार नाही, असे पालिकेच्या मलेरियाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मुंबईतल्या प्रयोगशाळाही हाऊसफुल झाल्या आहेत. पालिकेसोबतच खासगी प्रयोगशाळांतील रक्तचाचणीचे प्रमाणही दुप्पट झाले आहे. एक लाख रुग्णांच्या रक्ततपासणी नमुन्यांपैकी 59 हजार 844 जणांना मलेरिया झाल्याचे आढळून आले आहे.
तपासण्या -- खाजगी रुग्णालये -- पालिका रुग्णालये (दरवाढ कोष्टक)
सीबीसी, एमपी -- 200 --- 200 रुपये
टीथ्री, टीफोर, टीएचएस-- 350 --- 250
युरीन रुटीन -- 50 --- 35
जी.ओ.पी. --- 100 ---- 70
सोनोग्राफी -- 950 --- 150
ईसीजी --- 300 --- 270