सकाळ वृत्तसेवा
२२ सप्टेंबर २०१०
पुणे, भारत
पुण्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात डोळ्यांची साथ पसरली आहे. गणेशोत्सवातील गर्दीमुळे याचा प्रसार वेगाने होत आहे. आज (ता. 22) होणारी गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मिरवणूक मार्गांवर गर्दी करतात. त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
डोळे कसे येतात?
पुण्यात पसरलेली डोळ्यांची साथ "ऍडिनोव्हायरस' मुळे पसरली आहे. या विषाणूंचा प्रसार प्रमुख्याने रोगी व्यक्तीशी केलेल्या हस्तांदोलनातून, त्याच्या वस्तू किंवा प्रसाधने वापरल्यातून होतो. डोळे आलेल्या रुग्णाचे अश्रू, नाकपुडी किंवा श्लेष्म यांच्याशी संपर्क आल्यास या विषाणूंचा संसर्ग निरोगी व्यक्तीस होण्याचा धोका असतो. याची सुरवात एका डोळ्यापासून होते, मात्र त्याच संसर्ग दुसऱ्या डोळ्याला अगदी सहज होतो. तसेच, रुग्णाच्या परिसरातील निरोगी व्यक्तींनाही याची लागण होते. उजव्या डोळ्यापेक्षा डाव्या डोळ्याला संसर्ग होण्याचे प्रमाण सध्या जास्त असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
लक्षणे कोणती?
डोळे लाल होणे, सर्दी, डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळ्यांना खाज सुटणे, डोळ्यांत काहीतरी टोचते आहे असे वाटणे, डोळ्यांच्या कडांना सूज येणे, काही रुग्णांना कानाच्या पुढील भागातही सूज येते.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
डोळे आल्यानंतर प्रतिबंधात्मक उपचाराचा काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे डोळे लाल दिसल्यानंतर तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. डोळ्यांतील संसर्गाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी असलेल्या चाचण्या करता येतात.
काय करावे?
दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ कापड गार पाण्यात बुडवून ते दहा ते पंधरा मिनिटे संसर्ग झालेल्या डोळ्यांवर ठेवावे. हे कापड प्रत्येक वेळी बदलले पाहिजे. हात साबणाने स्वच्छ धुवावे. गॉगल वापरावा.
काय करू नये?
स्वतःच औषधोपचार घेऊ नयेत, गर्दीत जाणे टाळावे, गरम पाण्याचा वाफारा घेऊ नये, डोळे चोळू नयेत, "कॉन्टॅक्ट लेन्स'चा वापर करू नये.
विषाणूंचा संसर्गाचा कालावधी किती?
विषाणूंचा संसर्ग झाल्यापासून 10 ते 12 दिवस अतिशय संसर्गजन्य असतात. संसर्गाची तीव्रता दोन ते तीन आठवड्यांपर्यंत राहू शकते.
ऍडोनोव्हायरसचे सामर्थ्य काय?
संसर्गानंतर शरीराबाहेर कठीण पृष्ठभागावर तो सात आठवड्यांपर्यंत तग धरू शकतो. उष्णता किंवा विरंजनामुळे (ब्लीच) हा विषाणू मरतो.