सकाळ वृत्तसेवा
०१ जुलै २०१०
धनंजय पाठक
सांगली, भारत
डॉक्टर हा आपल्या समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांच्या अविरत आणि महत्त्वपूर्ण कार्यांचा गौरव आणि आदर व्यक्त करण्यासाठी भारतात एक जुलै हा "डॉक्टर्स डे' म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्त सांगली आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध गाडगीळ, मिरज आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. शिवानंद सोरटूर, फिजिशियन असोसिएशनचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल मडके यांनी डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध दृढ करण्याची गरज दै. 'सकाळ' शी बोलताना व्यक्त केली.
बिहारातील पाटनामधील बानिपोरे येथे जन्मलेले सुप्रसिद्ध डॉक्टर बी. सी. रॉय यांचा 1 जुलै 1882 हा जन्मदिन व मृत्यूदिन 1 जुलै 1962. त्यामुळे त्यांची स्मृती जपण्यासाठी 1 जुलैला नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. त्यांनी दुर्बल घटकातील व्यक्तींची केलेली सेवा सदैव स्मरणात राहणारी अशीच आहे. डॉक्टर्स डे निमित्त बोलताना नामवंत डॉक्टर म्हणाले, बदलत्या काळात सर्वच भावनिक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. त्यामुळे डॉक्टरी पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विक्रेता आणि ग्राहक हे स्वरूप घेऊ पाहात आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा "फॅमिली डॉक्टर' ही संकल्पना रुजवायला हवी.
एका बाजूला ग्राहक संरक्षण कायदा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णहित. या संवेदनशील कात्रीत डॉक्टर अडकले आहेत. याचा बऱ्याचदा विचार होत नाही. रुग्णांना कमीत कमी आर्थिक मोबदल्यात उत्तम सुविधा पुरविण्याच्या धावपळीत डॉक्टरांची दमछाक होते आणि त्यांचा ताण वाढतो. ही बाबही डॉक्टर्स डेच्या निमित्ताने इतरांनी लक्षात घ्यायला हवी.
यानिमित्त डॉक्टर-रुग्ण संवाद वाढायला हवा. रुग्णांनीही अधिक मनमोकळेपणाने डॉक्टरांसमोर आपल्या समस्या मांडायला हव्यात. प्रसंगी रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या बिलाबाबतही
डॉक्टरांपर्यंत आपले मत पोचवायला हवे, आणि अर्थातच डॉक्टरांनी आपले ज्ञान अद्ययावत करण्याबरोबरच आपण केवळ एखाद्या रोगावर इलाज करत नसून रुग्णावर म्हणजे पर्यायाने एका माणसावर इलाज करत आहोत. त्याला स्वतःच्या इतर अनेक ताणतणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. हा मानवी दृष्टिकोन सतत डोळ्यांसमोर ठेवला तर डॉक्टर्स डेला सर्वजण डॉक्टरांना मनापासून शुभेच्छा देतील.
समाजावर डॉक्टरांचे ऋण असते. मात्र, डॉक्टर याला तसे न समजता आपले कर्तव्य समजतो. रोग्याचे दु:ख निवारण करणे हे जसे डॉक्टरचे कर्तव्य असते, तसे त्यांच्याप्रती सहृदय संवेदना व्यक्त करणे, हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंधांना मानवतेची किनार हवी आहे.