Print
Hits: 3019

सकाळ वृत्तसेवा
०२ जुन २०१०
वानाडोंगरी, भारत

तुम्हाला कुत्रा चावला असेल तर आणखी चार जणांना चावल्यावरच दवाखान्यात या. पाच इंजेक्‍शनचे पॅकेज असल्यामुळे त्यातील तुम्हाला एक इंजेक्‍शन दिले असेल तर इतर चार इंजेक्‍शन खराब होतील, असा सल्ला देणारे वैद्यकीय अधिकारी असल्यावर कुत्रा चावलेल्या रुग्णांचे काय होणार, असा प्रश्‍न हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या वर्तनावरून निर्माण झाला आहे.

हिंगणा तालुक्‍यातील जनतेच्या मागणीचा विचार करून तालुक्‍यातील लोकसंख्येच्या आधारावर जनतेच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. तत्कालीन आमदार रमेश बंग यांच्या काळात या रुग्णालयाचे उद्‌घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. परंतु, याच रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस प्राप्त होत आहेत. तालुक्‍यातील गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार येथे सर्रास सुरू आहे. कुत्रा चावलेल्या रुग्णांवर येथे व्यवस्थित उपचार केले जात नसल्याची अनेकांनी तक्रार केली आहे.

काही दिवसांपूर्वी स्नेहा दिनेश गजभिये (वय 5, रा. अमरनगर) या बालिकेला कुत्रा चावला असता ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. तेव्हा डॉक्‍टरांनी आणखी चार कुत्रा चावलेले रुग्ण दवाखान्यात येतील तेव्हाच या बालिकेला इजेक्‍शन देण्यात येईल, असे तिच्या आईवडिलांना सांगितले. तिला दुसऱ्या दिवशी परत बोलविण्यात आले. पुन्हाही तिला हेच कारण सांगून परत पाठविण्यात आले. शेवटी ही बालिका एका महिन्याच्या आत दगावली. दुसरा युवक श्रीराम धुर्वे (वय 21, रा. नीलडोह) कुत्रा चावल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यालाही असेच सांगून घरी पाठविले. सामाजिक कार्यकर्ते सोपान बेताल यांनाही कुत्रा चावल्यानंतर रुग्णालयात गेले असता त्यांनाही याच समस्येला सामोरे जावे लागले. यावरून वैद्यकीय अधिकाऱ्यांत बराच वेळ बाचाबाची झाली. तुम्हाला एकट्याला इंजेक्‍शन दिले तर इतर चार इंजेक्‍शन खराब होतील, असे वारंवार सांगण्यात आले. नऊ वाजतापासून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत तरी वैद्यकीय अधिकारी आपल्या मतावर ठाम होते. शेवटी त्या दोन रुग्णांना इंजेक्‍शन देण्यासाठी बोलविण्यात आले व त्यानंतर डॉक्‍टरांनी इंजेक्‍शन दिले.

हा सर्व प्रकार बघता ग्रामीण रुग्णालयात कुत्रा चावलेल्या रुग्णांचे काय हाल होत असतील, ते सहज लक्षात येते. रुग्णांना कुत्रा चावल्यानंतरही त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्या आहेत. दूरदुरून येणाऱ्या रुग्णांना उपचाराविना परत जावे लागते. अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून, उपचाराअभावी जीव गमाविण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.