सकाळ वृत्तसेवा
२२ जुलै २०१०
रत्नागिरी, भारत
शासनाचा "डॉक्टर आपल्या दारी' हा उपक्रम बारगळल्यानंतर जिल्हा परिषदेने "डॉक्टर आपल्या घरी' हा स्वउपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर त्या-त्या गावात जाऊन पूर्ण वेळ आरोग्य सेवा देणार आहेत. हा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी एल. एस. साळे यांनी दिली.
अलीकडेच झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन वर्षांपूर्वी शासनाने "डॉक्टर आपल्या दारी' हा उपक्रम सुरू केला होता; मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याने हा उपक्रम बारगळला होता. त्यानंतर या संकल्पनेचा विस्तार करताना शालेय आरोग्य अभियान सुरू केले होते. यासाठी 18 डॉक्टरांची हंगामी तत्त्वावर नियुक्तीही करण्यात आली होती. या उपक्रमावरही पंचायत समितीने ताशेरे ओढल्यानंतर आता जिल्हा परिषदेने "डॉक्टर थेट आपल्या घरी' हा स्वतःचा उपक्रम निश्चित केला आहे. या उपक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत येणाऱ्या गावात जाऊन तेथे पूर्ण दिवस काम करणार आहेत. यामध्ये अंगणवाडी तपासणी, महिला आरोग्य अभियान, दंत चिकित्सा, शाळांची तपासणी आदी सुविधा ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पंचक्रोशीत आरोग्याच्या समस्या, पिण्याच्या पाण्याचा तपशील, वृद्ध, महिला, तरुण आणि विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी या उपक्रमात एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गावभेटीबरोबर घरभेटीही या अभियानात डॉक्टरांचे पथक घेणार असल्याचे श्री. साळे यांनी सांगितले.
'डॉक्टर आपल्या दारी' नव्हे 'थेट घरी'
- Details
- Hits: 3544
0